१५ वर्षीय फिरकीपटूची अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी, एकाच डावात घेतले १० बळी


१६ वर्षाखालील विजय मर्चंट चषक स्पर्धेत खेळताना मेघालयचा फिरकीपटू निर्देश बैसोयाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. निर्देशने नागालँड संघाविरोधात एकाच डावात १० बळी घेतले आहे. १५ वर्षीय निर्देश हा मुळचा मेरठचा असून त्याने काही वर्षांपूर्वी मेघालयकडून खेळण्यास सुरुवात केली आहे.

नागालँडविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात निर्देशने २१ षटके टाकून ५१ धावा देत १० बळी घेतले. निर्देशने २१ पैकी १० षटके निर्धाव टाकली होती. नागालँडचा संघ निर्देशच्या कामगिरीमुळे पहिल्या डावात ११३ धावांवर गारद झाल्यानंतर मेघालयने पहिल्या दिवसाअखेरीस प्रत्युत्तरादाखल ४ गड्यांच्या मोबदल्यात १०९ धावांपर्यंत मजल मारली आहे.

कोणत्याही गोलंदाजासाठी एकाच डावात १० बळी घेणे ही मोठी गोष्ट मानली जाते. जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांनाच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करता आलेली आहे. देबाशिष मोहंती, सुभाष गुप्ते, प्रदीम सुंदरम आणि पी.एम.चॅटर्जी यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करुन दाखवली आहे. याआधी मणिपूरच्या रक्स सिंहने १९ वर्षाखालील कूच बिहार करंडक स्पर्धेत १० बळी घेतले होते.

Leave a Comment