सिझेरियनविषयी काही


आपल्या नात्यातल्या किंवा परिचयातल्या नवविवाहितेला बाळ झाले की आपल्याला ती खुषखबर सुनावली जाते आणि आपण पहिला प्रश्‍न विचारतो, बाळ बाळंतीण खुशाल आहेत ना ? डिलेव्हरी कशी झाली ? सिझेरियन की नॉर्मल ? आता आता हे प्रश्‍न फार सामान्य तर झाले आहेतच पण या प्रश्‍नांचे एक उत्तरही सामान्य झाले आहे. ते म्हणजे सिझेरिन करावे लागले. हे उत्तर ऐकताच जुन्या काळातले लोक खेद व्यक्त करतात. सिझेरिन का करावे लागले, नॉर्मल डिलेव्हरी झाली असती तर बरे झाले असते. त्या लोकांचा हा दृष्टीकोन योग्य आहे पण नॉर्मल डिलेव्हरी नेहमीच योग्य असते असे नाही. सिझेरिनही काही वेळा आवश्यक असते. पण सामान्यत: लोक डॉक्टरांना दोषी धरतात. पैशाच्या लोभाने सिझेरिन केले जाते असे बोलतात.

असे आपल्याला सरसकट म्हणता येणार नाही कारण प्रसूत होणार्‍या महिलाही आता आता नॉर्मल डिलेव्हरीपेक्षा सिझेरिनच पसंत करायला लागल्या आहेत. त्यांनाही प्रसूती कळा नकोशा वाटायला लागल्या आहेत. त्या जीवघेण्या कळापेक्षा भूल देऊन काय करायचे ते करू द्या असे महिलांनाही वाटायला लागले आहे. नॉर्मल डिलेव्हरी म्हणजे आईचा पुनर्जन्म असतो. त्यामुळे अशा महिलांच्या कुटुंबातले लोकही सिझेरिनला प्राधान्य द्यायला लागले आहेत. पण या संबंधात लोकांचे बरेच अज्ञान आडवे येते असे डॉक्टरांचे मत आहे. सिझेरिनमुळे प्रसूती कळा टळतात हे खरे आहे पण प्रसूती कळा या तशा जीवघेण्या नसतात. ती कळ आली म्हणजे ४० सेकंदांपर्यंतच टिकते आणि दर दोन मिनिटांना येत असते.

सिझेरिनमध्ये कळा नसतीलही पण भूल देऊन ती शस्त्रक्रिया केली जाते. ती मेजर सर्जरी असते आणि एकदा भूल उतरली की नंतर वेदनाच अनुभवाव्या लागतात. उलट त्या १० ते १५ दिवस टिकतात. शिवाय या शस्त्रक्रियेनंतर संबंधित महिलेला फार जपून रहावे लागते. अनेक जोखिमा असतात. फार काळजी न घेतल्यास काही गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. सिझेरिनमध्ये आणखी एक अनिष्ट गोष्ट घडते. बाळ जन्माला आल्याबरोबर त्याला स्तनपान दिले पाहिजे. प्रसूतीनंतरच्या काही तासातले आईचे दूध त्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त असते पण सिझेरिन केलेली माता आपल्या बाळाला हे आवश्यक असलेले स्तनपान देऊ शकत नाही. सिझेरिन आणि नॉर्मल डिलेव्हरी यांना सरसकट चांगले वा वाईट ठरवून मोकळे होता येत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment