झोपेची उपेक्षा करू नका


आपल्या कार्यक्षमतेविषयीच्या काही कल्पनांनी झोपेविषयी काही गैरसमज निर्माण करून ठेवले आहेत. रामदास स्वामींनीही म्हटले आहे, निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख. म्हणजे झोपणे हे आळशीपणाचे लक्षण आहे असे आपण मानतो. त्यातूनच कमी झोप घेणे हे आपण कर्तबगारीचे लक्षण मानायला लागलो. आपले पंतप्रधान किंवा एखादे कार्यक्षम मुख्यमंत्री केवळ तीन ते चार तास झोपतात आणि दिवसाचे १८ तास काम करीत असतात अशा आख्यायिका आपण निर्माणही करतो आणि त्यावर विश्‍वासही ठेवतो. प्रत्यक्षात असे कोणीच करीत नसते. तीन ते चार तास झोप घेणारा माणूस फार दिवस जिवंत राहू शकत नाही. साधारण सात ते आठ तास झोप आवश्यकच आहे. तशी झोप न घेणे हे आरोग्यासाठी घातक आहे. ज्यांना झोप कमी मिळते त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मरण येण्याची शक्यता अधिक असते.

त्यातल्या त्यात झोप कमी मिळणारा असा माणूस जर मधूमेह, रक्तदाब, यांनी त्रस्त असेल किंवा लठ्ठ असेल तर त्याच्या बाबतीत ही शक्यता अधिक असते असे संशोधकांना आढळून आले आहे. अशा प्रकारची संशोधने अमेरिकेत केली जातात तेव्हा ती व्यापक प्रमाणावर केली जातात आणि अनेकांवर प्रयोग करून शास्त्रीय पद्धतीने निष्कर्ष मांडले जातात. उगाच कोणातरी एकाला असा असा अनुभव आला एवढ्या दंतकथेवर ते आपले दावे कधीच करीत नाहीत. आता हेही संशोधन अमेरिकेतल्या पेनसिल्वानिया मधील अमेरिकेन हार्ट असोेसिएशन या संस्थेने १३४४ लोकांवर प्रयोग करून आपले निष्कर्ष मांडले आहेत. त्यांनी प्रयोगासाठी निवडलेल्या लोकांचे सरासरी वय ४९ वर्षे होते आणि त्यात ४२ टक्के पुरू ष तर ५८ टक्के महिला होत्या.

यातल्या मधुमेह, रक्तदाब आणि जाडी असे रोग असणारांना हाय रिस्क ग्रुप असे म्हटले गेले आणि अन्य लोकांना सामान्य रुग्ण मानले गेले. यातल्या हाय रिस्क गु्रपच्या लोकांच्या मृत्यूच्या कारणांत कमी झोप असणे हे सर्वात मोठे कारण दिसून आले. तेव्हा ज्यांना हृदयविकार होणारे हे रोग आहेत त्यांनी जास्तीत जास्त झोप घेतली पाहिजे. कमी झोप घेणे त्यांच्यासाठी धोकादायक मानले पाहिजे. कमी झोप घेणे आणि दिवसातले १८ तास काम करणे एखाद्या पंतप्रधानांसाठी गरजेचे असेल पण आपण त्यांचा या बाबतीत आदर्श मानता कामा नये. सात ते आठ तास झोप घेतल्यास कामाला कमी तास मिळतात हे खरे पण या कमी तासात आपण ताजे तवाने असल्याने जादा काम होत असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment