भारतात विषारी हवा सोडण्यामागे पाक-चीनचा हात, भाजपमंत्र्याचा जावईशोध


नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील हवेचा स्तर खालावला असल्यामुळे घराबाहेर पडणे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे झाले आहे. उत्तर प्रदेश भाजपमधील राज्य व्यापार मंडळाचे संयोजक विनीत शारदा यांनी या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये प्रदूषण निर्माण करण्यामध्ये चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा जावईशोध लावला आहे.

एकीकडे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे तर्कशून्य वक्तव्य करताना काही नेते पाहायला मिळत आहेत. शेतकरी पिकांचा टाकाऊ भाग पेटवून देत असल्यामुळे प्रदूषण वाढत आहे, असे म्हटले जात आहे. पण मला असे वाटते की, पाकिस्ताने हा विषारी वायू भारतीय लोकांना त्रास देण्यासाठी सोडला असावा. भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या चकमकीमध्ये प्रत्येकवेळेस पाकिस्तान पराभूत झाला आहे. मोदी आणि अमित शाह यांनी केलेल्या कारवाईमुळे सध्या पाकिस्तान आणि चीन घाबरलेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या कृष्ण युग आले आहे. कृष्ण आणि अर्जुन म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह असून त्यांच्यासारखी वेगळी रणनीती अद्याप कुणीच अवलंबली नसल्याचे विनीत यांनी म्हटले आहे. यापूर्वी मंत्री सुनील भराला यांनी प्रदूषण कमी करण्यासाठी यज्ञ करुन इंद्रदेवाला खूश करा ते सगळे काही ठीक करतील, असे वक्तव्य केले होते. नागरिक प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी करत असल्यामुळे शहरामध्ये आरोग्य आणीबाणी आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सकाळी व्यायामासाठी तसेच दिवसभर नागरिक मास्क लावून बाहेर पडत आहेत.

Leave a Comment