भाजपच्या कार्यकाळात अमित शहांच्या चिरंजीवांची संपत्ती १५०० टक्क्यांनी वाढली


नवी दिल्ली – ‘द कारवान’ या संकेतस्थळाने केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पूत्र आणि अलिकडेच बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झालेल जय शहा यांच्या कंपनीची कमाई १५०० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त दिले आहे.

जय शहा यांच्या कुसुम फिनझर्व्ह एलएलपी (Kusum Finserve LLP) या कंपनीची एकूण कमाई २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर ७९ लाख ६० हजार रुपये एवढी होती. या कंपनीची एकूण कमाई मागील पाच वर्षांमध्ये ११९ कोटी ६१ लाख रुपये एवढी झाल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर कुसुम फिनझर्व्ह एलएलपीने माहिती दाखल केली होती. कंपनीने दाखल केलेल्या माहितीच्या आधारे कंपनीच्या व्यवसाय वृद्धीचे वृत्त कारवानने दिले आहे.

जय शहा या कंपनीत भागीदार असून, जय शहा कंपनीच्या संचालक पदाच्या समतुल्य पदावर कार्यरत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात आल्यानंतर २०१४ ते २०१९ या आर्थिक वर्षात कुसुम फिनझर्व्ह एलएलपी कंपनीच्या संपत्तीत ११८ कोटी रूपयांहून अधिकची वाढ झाल्याचे म्हटले आहे.

या वृत्तामधील माहितीनुसार जय यांच्या कंपनीला २०१७ ते २०१८ दरम्यान आर्थिक व्यवहाराचे तपशील देण्यास सांगण्यात आले, तेव्हा या कंपनीची कमाई भरमसाठ वाढल्याचे पहिल्यांदा लक्षात आले. कंपनीची आर्थिक स्थिती २०१४ आणि २०१५ मध्ये फारशी चांगली नसतानाही कंपनीला २०१६ पासून मोठ्या प्रमाणात क्रेडिटवर मोठी रक्कम देण्यात आल्याचे वृत्तामध्ये म्हटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कारवानच्या या वृत्ताचा हवाला देत जय शहा यांच्यावर टीका केली आहे. द कारवानने दिलेले वृत्त आता मारून टाकले जाईल. राहुल गांधींनी कनपट्टी पर गन लगा कर, असे म्हणत निशाणा साधला आहे.

काँग्रेसने ३ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन जय शहा यांच्या संपत्तीसंदर्भात चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. जय शहा यांच्या कंपनीने २०१७ ते २०१८ च्या आर्थिक व्यवहारांचा तपशील कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला दिला नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खैरा यांनी केला आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीने आयकर भरला नाही तर तो मोठा गुन्हा समजून त्याला पाच लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जातो, पण हे असे होताना जय शहा यांच्या प्रकरणात दिसत नसल्याचे खैरा यांनी म्हटले आहे. युवराज जय शहा यांना आयकर न भरल्यास होणाऱ्या दंडासंदर्भातील कायदा लागू होते नाही कारण त्यांच्या कंपनीने २०१७ आणि २०१८ चे विवरण सादर केले नसल्याचा टोलाही खैरा यांनी लगावला आहे.

असा कोणता व्यवसाय जय शहा यांची कुसुम फिनझर्व्ह एलएलपी ही कंपनी करते की त्यांना एक हजार ५०० टक्क्यांचा नफा झाला आहे असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे. कुसुम फिनझर्व्ह एलएलपी शेअर ट्रेडींग, शेती उत्पादने, कन्सल्टन्सी या क्षेत्रात काम करते. काँग्रेसने यावेळी हा मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Leave a Comment