शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आदित्य ठाकरे !


मुंबई – दोन आठवड्यांपेक्षा अधिकचा कालावधी राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून उलटून गेला आहे. अशा परिस्थितीत सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटला नाही. आपल्या मागण्यांवर शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष ठाम असल्याने अद्यापही सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. अशातच राज्यात दोन दिवसांमध्ये सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने दिली आहे.


यासंदर्भात एक ट्विट युवासेना सदस्य राहुल कनाल यांनी केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. शिवतीर्थावर काही दिवसात हा आवाज घुमेल… मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू आदित्य उद्धव ठाकरे ईश्वराची शपथ घेतो की… असा संदेशही यामध्ये त्यांनी लिहिला आहे.

आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असे शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी म्हटले होते. तसेच एक बॅनर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर लावण्यात आला आहे. त्यावर माझा आमदार, माझा मुख्यमंत्री असे लिहित युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला होता. हे पोस्टर शिवसेनेचे नगरसेवक हाजी हलीम खान यांनी लावले होते. त्यावर आदित्य ठाकरे यांच्या फोटोसह ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’ आणि साहेब आपण करून दाखवले असाही संदेश लिहिण्यात आल्यामुळे मुख्यमंत्रिपदाची शिवसेनेची मागणी अद्यापही कायम असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरे यांचेच नाव पुढे होताना दिसत आहे.

Leave a Comment