थायरॉईड असमतोलावर उपाय


थायरॉईड ग्रंथीचे काम व्यवस्थित चालत नसल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. विशेषतः अलीकडच्या काळात थायरॉईड ग्रंथीच्या बिघाडामुळे वजन वाढण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. या विकारावर अनेक प्रकारची औषधे दिली जातात. मात्र त्या औषधासोबतच खाणे आणि राहणे या दोन्ही गोष्टीत खूप कडक पथ्ये पाळावी लागतात. हा प्रामुख्याने राहणीमानातील दोषाचाच परिणाम आहे. तेव्हा थायरॉईड ग्रंथीचा प्रश्‍न सोडवायचा असेल तर डॉक्टर आणि आहारतज्ञ राहणीमान बदलण्याचा सल्ला देतात. शेवटी कोणताही विकार हा चुकीच्या राहणीतून आणि चुकीच्या आहारातूनच निर्माण होऊन वाढत असतो. त्यामुळे खाण्याची पथ्ये ही प्रत्येक विकारात अत्यावश्यक असतात.

थायरॉईड ग्रंथीच्या समस्या सोडवण्यासाठी असाच जीवनमान बदलण्याचा, व्यायामाचा आणि संतुलीत आहाराचा सल्ला दिला जात असतो. या संबंधात खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आहारामध्ये आयोडीन पर्याप्त स्वरूपात उपलब्ध झाले पाहिजे आणि ते आपल्याला अंडी, पालक आणि लसूण यातून प्राप्त होत असते. आपले सेलेनियम काऊंट चांगले नोंदले जावे असे वाटत असेल तर आहारामध्ये मश्रुमचे प्रमाण वाढवले पाहिजे. इतर अनेक कारणांसाठी मांसाहार वर्ज्य समजला जात असला तरी सेलेनियम काऊंटसाठी मांसाहार करावा असे आहारतज्ञांचे मत आहे. याच कामासाठी सोयाबीन आणि सूर्यफुलाचे बी उपयुक्त ठरते असा अनुभव आहे.

निरोगी थायरॉईडसाठी झिंकची फार आवश्यकता असते आणि ते आपल्याला वाटाणा, हरभरा, बदाम आणि सर्व प्रकारच्या द्विदल धान्यातून प्राप्त होत असते. तेव्हा आहारामध्ये उसळीचे प्रमाण वाढवा. थायरॉईडच्या नियंत्रणात लोहाची भूमिका फार निर्णायक असते आणि ते कशातून प्राप्त होते याचा अभ्यास करून तसा आहार आपण घेतला पाहिजे. सध्या स्वयंपाकासाठी ऍल्युमिनिअमच्या पत्राच्या कढया वापरल्या जातात. पूर्वीच्या काळी लोखंडाच्या कढया आणि लोखंडाचेच तवे वापरले जात होते. त्यांच्या वापरामुळे आपल्या आहारात आवश्यक एवढे लोह आपोआपच समाविष्ट केले जात होते. ऍल्युमिनिअमचा तवा वापरण्याने आपल्याला मिळणारे हे लोह कमी झाले आहे. तेव्हा लोखंडाचे तवे आणि कढया वापरणे हा लोह प्राप्त होण्याचा साधा उपाय आहे. त्याचे इतर फायदे अनेक आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment