एखाद्या लक्झरी कारपेक्षाही महाग आहे ‘भीम’

राजस्थानच्या पुष्कर आंतरराष्ट्रीय प्राणी मेळाव्यात विविध प्रजातीचे जवळपास 5 हजार प्राणी पोहचले आहेत. यामधील एक मुर्रा प्रजातीचा ‘भीम’ नावाचा रेडा देखील आहे. या रेड्याची किंमत तब्बल 14 कोटी रूपये असून, या रेड्याला दुसऱ्यांदा या प्रदर्शनात आणण्यात आले आहे. याचे वय साडेसहा वर्ष असून, वजन तब्बल 1300 किलो आहे.

या रेड्याचे मालक जवाहर लाल जांगिड, मुलगा अरविंद जांगिड आणि अन्य त्यांचे मित्र रेड्याला घेऊन आले आहेत. या मेळाव्यात उंच उंट आणि काही सुंदर घोडे देखील आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. मात्र सर्वाधिक चर्चा भीम रेड्याची होत आहे.

या रेड्याच्या खाण्या-पिण्याचा प्रती महिन्याचा खर्च दीड लाख रूपये आहे. अरविंद यांनी सांगितले की, त्याला दररोज एक किलो तूप, अर्धा किलो लोणी, 200 ग्रॅम मध, 25 लीटर दूध आणि एक किलो काजू-बदाम खायला घातले जाते.

हा रेडा या मेळाव्यात विकण्यासाठी आणला नसून, मुर्रा प्रजातीच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशाने केवळ प्रदर्शनासाठी आणण्यात आले आहे. रेड्याचे मालक त्याचे वीर्य देखील उपलब्ध करून देतात. मुर्रा प्रजातीच्या रेड्याच्या वीर्याची देशात मोठी मागणी आहे.

भीमचे वजन एक वर्षात 100 किलो आणि किंमत 2 कोटींनी वाढली आहे. आता या खास रेड्याची किंमत 14 कोटी रूपये आहे.

 

Leave a Comment