मनोविकारांचा विळखा


नुकताच जगभरात जागतिक स्किझोफे्र्रनिया दिन साजरा करण्यात आला. स्किझोफ्रेनिया हा एक मनोविकार असून तो झालेल्या व्यक्तीला दुभंगलेले व्यक्तीमत्त्व असे म्हटले जाते. या निमित्ताने या विकारावर बरेच जनजागरण करण्यात आले. परंतु स्किझोफे्रनिया हा काही एकमेव मनोविकार नव्हे. माणसाला अनेक प्रकारचे मनोविकार सतावत असतात. विशेषतः सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि स्पर्धेच्या युगात या मनोविकाराचे अनेक प्रकार लोकांना जडायला लागले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे लोकांचे आपापसातले भावनांचे देणेघेणे कमी होत चालले आहे. ग्रामीण भागात लोक गरीब असतील पण ते परस्परांना धरून असतात आणि आपल्या मनातील तणाव सहजपणे दुसर्‍याला बोलून दाखवतात. केवळ बोलून दाखवल्यानेसुध्दा मनावरचे दडपण कमी होत असते.

शहरात मात्र प्रत्येकजण आपल्या मनातल्या भावना दुसर्‍यांना बोलून दाखवत नाही. आपल्या मनाची कमतरता इतरांना कळली तर आपल्याला कमीपणा येईल आणि प्रतिष्ठा जाईल असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे कोणी कोणाच्या भानगडीत पडत नाहीत आणि मनावरची अनेक दडपणे घेऊन लोक जगत राहतात. त्याचे परिणाम त्यांच्या मनावरही होतात आणि शरीरावरही होतात. अशा विकारांमध्ये ड्रिप्रेशन आणि लैंगिक व्यवहारातील असाधारणतः, निद्रानाश इत्यादी विकारांचा प्रामुख्याने समावेश होतो. नैराश्य आणि तीव्र डोकेदुखी ही याच विकारांची अपत्ये होत. भारतामध्ये अशा विकारांचे प्रमाण फार वाढत आहे. मात्र त्यावर इलाज करण्यासाठी आवश्यक तेवढे समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञ आपल्या देशात उपलब्ध नाहीत ही दुःखाची बाब आहे.

जागतिक प्रमाणानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे एक मानसशास्त्रज्ञ असण्याची गरज आहे. परंतु भारतात मात्र दर चार लाख लोकांमागे एक मानसशास्त्रज्ञ उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतात आज १३ हजार ५०० मानसशास्त्रज्ञांनी आवश्यकता आहे. परंतु प्रत्यक्षात ३ हजार ८०० मानसशास्त्रज्ञ उपलब्ध आहेत. ही कमतरता भरून काढणे फारसे अवघड नाही. परंतु शैक्षणिक करिअर म्हणताच केवळ वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखांकडे पळत चाललेल्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्रज्ञ होणे हासुध्दा एक करिअरचा चांगला पर्याय आहे. हे कोणीतरी समजून सांगावे लागेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment