राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर


मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याचे संकेत दिले आहेत. संपूर्ण भाजप खंबीरपणे देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभी असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी केला. अद्यापपर्यंत कोणताही प्रस्ताव शिवसेनेकडून आलेला नाही. भाजपचे दार त्यांच्या प्रस्तावासाठी खुले असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

भाजप-शिवसेनेतील महायुतीचे सरकार स्थापन करण्याबाबतची चर्चा बंद आहे. प्रसारमाध्यमातून दोन्ही पक्षातील नेते वेगवेगळे दावे करत आहे. सत्ता स्थापन करण्यात भाजप अपयशी ठरल्यास शिवसेना सत्ता स्थापन करेल असे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणत आहेत. दरम्यान, भाजपची सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

मुख्यमंत्री भाजपचाच होणार का? झालाच तर फडणवीसांना बाजुला करून अमित शहा यांच्या विश्वासातील चंद्रकांत दादा पाटील यांना मुख्यमंत्री करण्यात येईल का? की सर्व पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध असलेल्या नितीन गडकरींना मुख्यमंत्रीपद देण्यात येईल अशा अनेक चर्चांना उधाण आले होते. या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देताना संपूर्ण भाजपे देवेंद्र फडणवीसांच्या पाठिशी असून त्यांना एकमताने विधीमंडळाच्या नेतेपदी निवडले असल्याचे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले, लवकरात लवकर आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार स्थापन होणार असून, अद्याप कोणताही प्रस्ताव शिवसेनेकडून आलेला नाही. भाजपचे दरवाजे शिवसेनेच्या प्रस्तावासाठी खुले आहेत. प्रस्ताव त्यांनी पाठवला तर त्याचा विचार भाजप नक्की करेल, असे पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांनीही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असून, लवकरच गोड बातमी कळेल, असे सांगत सत्ता स्थापनेच्या घटनेला भाजपने वेग दिला असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

Leave a Comment