मुंबई महानगरपालिकेला ८५ तक्रारदारांना द्यावे लागणार ४२ हजार ५०० रुपये


मुंबई – मुंबईमधील रस्त्यांवर पावसाळा गेला तरी आजही खड्डे कायम आहेत. बृह्नमुंबई महानगरपालिकेने मागील आठवड्यात ‘खड्डे दाखवा अन् ५०० रुपये मिळवा’ ही योजना सुरू केली होती. मुंबईकरांचा याला भरघोष प्रतिसाद मिळत आहे. मागील चार दिवसांत महापालिकेच्या अ‍ॅपवर खड्ड्यांच्या ९९७ तक्रारींची नोंद झाली. यामध्ये पहिल्या तीन दिवसांत दाखल झालेल्या ८७९ तक्रारींपैकी ७९४ खड्डे २४ तासांत बुजवण्यात आले आहेत. पण २४ तासांत ८५ खड्डे बुजवता न आल्याने खड्ड्याची तक्रार करणाऱ्या नागरिकांना संबधित वॉर्ड अधिकाऱ्यांना ४२ हजार ५०० रुपये बक्षिस खिशातून द्यावे लागणार आहे.

महापालिकेने पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करून तब्बल ८० कोटी रुपयांचे कंत्राट दिले. पण, मुंबईत तरीही अनेक ठिकाणी खड्यांनी रस्त्यांची चाळण झाली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मलमपट्टी सुरू असल्याने अल्पावधीतच पुन्हा खड्डे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी खड्डे बुजत नसल्याने मुंबईकरांमध्ये संतापाची प्रतिक्रिया असल्यामुळे अखेर यावर प्रशासनाने पर्याय शोधत मोठ्या आकाराच्या खड्ड्यांची तक्रार करा आणि तक्रारीनंतर २४ तासांमध्ये ते न बुजल्यास ५०० रुपयांचे बक्षीस मिळवा अशी योजना लागू केली.

स्थायी समितीत त्यावरुन तीव्र पडसाद उमटले. संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांच्या खिशातून बक्षिसाची ही रक्कम दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. खड्ड्यांच्या तक्रारी करा आणि २४ तासांत न बुजल्यास ५०० रुपये मिळवा, ७ नोव्हेंबरपर्यंत ही योजना आहे. पण याला सुरुवातीलाच मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे सात दिवसांत रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात खड्डे योजनेमुळे बुजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांची तक्रार केल्यानंतर २४ तासांमध्ये खड्डा न बुजल्यास ५०० रुपये बक्षीस योजना महानगरपालिकेने जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी गेल्या शनिवारपासून सुरू करण्यात आली असून नागरिकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खड्ड्यांच्या तकारींचा महापालिकेच्या अ‍ॅपवर ओघ सुरू आहे. योजना सुरू झाल्यानंतर चार दिवसांत या अ‍ॅपवर ९९७ तक्रारी नोंदविण्यात आल्या. पण २४ तासाची डेडलाईन हुकल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना खड्डे न बुजलेल्या ८५ खड्ड्यांचे बक्षीस तक्रारदारांना द्यावे लागणार आहे.

Leave a Comment