मायक्रोसॉफ्टचा ‘फोर डे वीक’, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ

भारतात सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून अधिक काम करून घेण्यासाठी त्यांचा ऑफिस वेळ वाढवून 9 तास करण्याचा विचार सुरू आहे. तर दुसरीकडे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उलटे केले आहे. मायक्रोसॉफ्टने आपल्या जापान युनिटमध्ये ऑगस्टपासून कर्मचाऱ्यांना एक महिने आठवड्यातून चारच दिवस काम करण्यास सांगितले. यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादन क्षमता देखील वाढली असून,मागील वर्षीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी यात वाढ झाली आहे.

कंपनीने 2300 कर्मचाऱ्यांना शुक्रवारी देखील सुट्टी दिली. याप्रकारे कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून केवळ 4 दिवसच काम केले. या प्रयोगामुळे कर्मचाऱ्यांना इतर सुट्ट्या घ्याव्या लागल्या नाहीत. तसेच, एवढ्या सुट्ट्या मिळत असल्याने कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या घेणेच बंद केले.

मायक्रोसॉफ्टने सांगितले की, मिटिंगमध्ये कमी वेळ लागत असल्याने उत्पादकतेमध्ये अधिक वाढ झाली. एकही मिटिंग 30 मिनिटांपेक्षा अधिक चालली नाही. अनेक मिटिंग्स तर वर्च्युल झाल्या. ईमेल्सला उत्तर देखील त्वरित मिळाली. याशिवाय विजेचा वापर देखील 23.1 टक्के कमी झाला आणि 58.7 टक्के कागदांचा कमी वापर झाला. यामुळे कंपनीचा खर्च देखील कमी झाला.

एक महिन्याच्या शेवटी 92.1 टक्के कर्मचाऱ्यांनी हा प्रयोग चांगला असल्याचे म्हटले. मात्र विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या कंपनीत सातही दिवस काम चालते, अशा ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी भरावे लागतील.

Leave a Comment