माफक प्रमाणात मद्यसेवनही घातकच


मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतात विपरीत परिणाम
लंडन: मद्यपींकडून आपल्या समर्थनासाठी बऱ्याचदा कमी प्रमाणात आणि कमी वारंवारीतेने मद्यप्राशन करीत असल्याचा दावा केला जातो. मात्र माफक प्रमाणात पद्यप्राशन करणेही आरोग्याला घटक असून त्याचा प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचा इशारा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन यांच्या संयुक्त संशोधक गटाने दिला आहे.

या गटाने सन १९८५ ते २०१५ ही सलग ३० वर्ष अती मद्यप्राशन करणारे, माफक मद्यप्राशन करणारे आणि क्वचित मद्यप्राशन करणारे अशा तिन्ही प्रकारच्या आणि सामान्य आरोग्य असलेल्या आणि सरासरी ४३ वर्ष वयाच्या ५५० मद्यपींच्या दर आठवड्याला मद्यसेवनाचे प्रमाण, मेंदूची कार्यक्षमता; नियमितपणे तपासली. संशोधनाच्या शेवटी मेंदूच्या कार्यक्षमतेचा आढावा घेण्यासाठी त्यांचे एमआरआय स्कॅनिंग करण्यात आले. त्यामध्ये माफक प्रमाणात मद्यप्राशन करण्यानेही मेंदूच्या यंत्रणांमध्ये बिघाड होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा तऱ्हेने मद्यप्राशन करणाऱ्यांच्याही स्मरणशक्ती आणि दिशाज्ञानाचा ऱ्हास होत असल्याचे अर्थात हिप्पोकँपल ऍट्रोफी या विकाराला बळी पडत असल्याचे या दीर्घलाकीन निरीक्षणातून दिसून आले.

आठवड्याला ३० युनिट्स किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात अल्कोहोल सेवन करणाऱ्यांना मेंदूची कार्यक्षमता घटण्याचा धोका सर्वाधिक प्रमाणात असतो. मात्र आठवड्याला १४ ते २१ युनिट्स घेणाऱ्यांनाही हा धोका मद्यप्राशन न करणाऱ्या किंवा त्यापासून मुक्त झालेल्यांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात असतो; असे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. माफक मद्यप्राशनाने हा धोका कमी होत असल्याचे आपल्याला आढळून आले नसल्याचे संशोधकांनी सांगितले.

एक युनिट म्हणजे १० मिली शुद्ध अल्कोहोल. मोठ्या बियरमध्ये २ युनिट्स, वाईनच्या एका बाटलीत ९ युनिट्स; तर २५ मिली मद्यामध्ये १ युनिट अल्कोहोलचे प्रमाण असते. अमेरिकेमध्ये आठवड्याला २४. ५ युनिट्सचे सेवन सुरक्षित मानले जाते. मात्र या अभ्यासानुसार आठवड्याला १४ ते २१ युनिट्सचे सेवनही मेंदूच्या यंत्रणेत बिघाड घडवून आणण्यात पुरेसे ठरते; असे स्पष्ट झाले आहे.

अशा प्रकारच्या निरीक्षणात्मक अभ्यासातून कारणे आणि परिणाम ठोसपणे सांगणे शक्य नसले तरीही त्याचे सामान्य निष्कर्ष सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरू शकतात; असेही संशोधकांनी नमूद केले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment