उत्तर प्रदेशमधील सरकारी कर्मचारी चक्क हेल्मेट घालून करताहेत काम


कानपूर – आता डोक्यावर हेल्मेट घालून काम करण्यास उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील ऊर्जा विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे. त्यामागे कारण देखील तसेच आहे. हे कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात तेथील इमारतीची दुरावस्था झाली असून आहे. कधीही डोक्यावरील छत कोसळेल, हे सांगता येत नसल्यामुळेच भितीने त्यांनी रोज डोक्यावर हेल्मेट घालून काम करण्यास सुरुवात केली.

याबाबत माहिती देताना एक कर्मचाऱ्याने सांगितले की, कधीही आमच्या डोक्यावरील छत कोसळेल याचा काही नेम नाही. आमच्या डोक्याला या स्थितीत कोणतीही दुखापत होऊ नये, म्हणूनच आम्ही हेल्मेट घालून काम करण्यास सुरुवात केली आहे. छताचा काही भाग आतापर्यंत कोसळल्यामुळे विभागातील काही कर्मचारी किरकोळ जखमीही झाले आहेत. पण वरिष्ठांकडून त्यानंतरही इमारतीचे काम करण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या इमारतीची दुरावस्था झाल्याचे उत्तर प्रदेशमधील या विभागातील मुख्य अभियंता के के भारद्वाज यांनीही कबूल केले. त्याचबरोबर लवकरच या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल, असे सांगितले.

Leave a Comment