लठ्ठपणावर बागकामाचा उपाय


सध्या लहान वयातील आणि पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या वाढत्या लठ्ठपणाचा प्रश्‍न मोठा गंभीर झाला आहे. हा प्रश्‍न केवळ भारतातच आहे असे नाही तर सार्‍या जगातच तो निर्माण झालेला आहे आणि देशादेशीचे संशोधक यावर काय उपाय योजता येईल याचा सखोल अभ्यास करत आहेत. कारण हा लठ्ठपणा एकटा येत नाही. तो सोबत मधूमेह, हायपरटेंशन, रक्तदाब आणि हृदयविकार यांना घेऊन येतो. वास्तविक पाहता या सगळ्या समस्यांवर निरोगी आयुष्य जगणे, निरोगी आहार घेणे, संतुलित आहार घेणे हे सोपे उपाय आहेत. मात्र हे उपाय सांगायला जेवढे सोपे आहेत तेवढे ते अनुसरायला अवघड आहेत. त्यामुळे या व्यतिरिक्त अजून काही उपाय सापडतात का यावर संशोधक विचार करत असतात.

काही संशोधकांना असे आढळले आहे की लठ्ठपणाच्या या समस्येने त्रस्त असलेल्या मुलामुलींनी दररोज एखादा तास बागकाम केले तर त्यांच्या लठ्ठपणाला काही प्रमाणात का होईना पण उतार पडतो. या संबंधात डॉ. रेमन गोयल यांनी केलेल्या निरीक्षणानुसार बागकाम केल्याने मुलांचा लठ्ठपणा काही प्रमाणात का होईना कमी होतो. कारण बागकामाच्या निमित्ताने ही मुले वनस्पतींच्या संपर्कात येतात. झाडांचा आणि वेलींचा ताजा नैसर्गिक हिरवा रंग त्यांच्या मनावर असा काही परिणाम करून जातो की जाडी वाढवणारे तेलकट, तुपकट पदार्थ त्यांना मनापासून नकोच वाटायला लागतात आणि हिरव्या पालेभाज्या, ताज्या फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत असे त्यांना मनापासून वाटायला लागते आणि वर्षभरामध्ये त्यांची जाडी कमी व्हायला लागते.

डॉ. गोयल यांच्या मते हे संशोधन मोठे मौलिक आणि उद्बोधक आहे. विशेषतः भारतामध्ये जाड मुलामुलींच्या मानसिकतेत बदल घडवण्याची क्षमता निसर्गात नक्की आहे, असे त्यांना वाटते. या संबंधात करण्यात आलेली एक दुसरी पाहणी मोठी उद्बोधक आहे. जी मुले जंक फूड न खाता भाज्या खातात त्या मुलांची लिखाणाची क्षमता चांगली असते आणि ब्रिटन आणि अमेरिकेत मुलांच्या स्पेलिंग तयार करण्याच्या स्पर्धा होतात तेव्हा स्पेलिंग तयार करण्याची क्षमता शाकाहारी मुलांत जास्त असते. विशेषतः जी मुले हिरव्या पालेभाज्या जास्त खातात त्यांच्यात ही क्षमता प्रकर्षाने जास्त असल्याचे आढळते. शाकाहारी असणे आणि जंकफूड न खाणे याचे होणारे हे चांगले परिणाम लठ्ठपणावर संशोधन करताना समोर आले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment