आर्थिक फसवणूक प्रकरणी OYO च्या संस्थापकासह 7 जणांविरोधात एफआयआर दाखल

ओयो हॉटेल्स अँन्ड होम्सचे फाउंडर रितेश अग्रवाल आणि अन्य 6 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एका हॉटेल व्यावसायिकाने ओयोवर मागील 5 महिन्यात पेमेंट न दिल्याचा आरोप केला आहे. हॉटेल मालकाने ओयोवर 35 लाख रूपये देणे असल्याचा आरोप केला आहे.

बंगळुरू येथील डोमलर कस्बे येथील हॉटेल रॉक्सेल इनचे मालक बेट्स फर्नांडिस यांच्या तक्रारीनुसार, ओयोने त्यांच्या हॉटेल्सच्या रूम बुकिंग करताना प्रत्येक महिन्याला 7 लाख रूपये देण्याचे ठरले होते. मात्र मे पासून त्यांचे पेमेंट केलेले नाही.

एफआयआरमध्ये रितेश अग्रवाल यांच्यासोबतच ओयो (साउथ) चे प्रमुख रोहित श्रीवास्तव, बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख- माधवेंद्र कुमार आणि गौरब डे, फायनान्स ऑफिसर- प्रतीक अग्रवाल, मंजीत सिंह आणि म्रिमोनी चक्रबर्ती यांच्या नावाचा समावेश आहे.

ओयोने यावर म्हटले आहे की, तक्रारदाराच्या विरोधात आम्ही देखील तक्रार दाखल करणार आहोत. त्यांची तक्रार चुकीची आणि मानहानिकारक आहे.

Leave a Comment