दिल्लीत खाकी आणि काळा कोट यांचा राडा


नवी दिल्ली – खाकी वर्दीविरोधात काळे कोट अर्थात पोलिसांविरोधात वकिल आक्रमक झाल्याचे चित्र दिल्लीत असून पार्किंगच्या कारणावरुन दिल्ली पोलीस आणि काही वकिलांमध्ये वाद झाला. पुढे हा वाद फक्त उफाळलाच नाही तर चिघळलाही. लॉकअप व्हॅनसमोर एका वकिलाने कार उभी केली होती. वकिलाला असे करु नका असे पोलिसांनी म्हटले होते. पण यावरुन तीस हजारी न्यायालयात वकील आणि पोलीस यांच्यात हाणामारी झाली. दिल्लीत या घटनेनंतर पोलीस विरुद्ध वकील असा वाद रंगला आहे.

लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करणारे वकील आणि पोलीस हे दोन्ही एकमेकांमध्ये भिडले असून एकमेकांविरोधात कारवाईची मागणी करत आहेत. पोलिसांवर वकिलांनी कारवाईची मागणी केली आहे. तर जे वकील या राड्यात होते त्यांचा परवाना रद्द करा, असे पोलिसांनी म्हटले आहे.

पार्किंगच्या कारणावरुन तीस हजारी न्यायालयात सुरु झालेला वाद पुढे एवढा मोठा होईल अशी शंका देखील कोणाला आली नसेल. जेव्हा सुनावणीसाठी आरोपींना आणले जाते ती लॉक अप व्हॅन तीस हजारी न्यायालयासमोर उभी होती. एका वकिलाने त्यावेळी या व्हॅनसमोर कार पार्क केली. त्यावरुन हा राडा सुरु झाला. राड्यादरम्यान पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात एका वकिलाचा मृत्यू झाला अशीही अफवा पसरल्यामुळे एका छोट्या कारणावरुन सुरु झालेला वाद चांगलाच चिघळला.

पोलिसांवर या अफवेनंतर संतापलेल्या वकिलांनी हल्ला चढवला आणि त्यांना मारहाण केली. तीस हजारी न्यायालय परिसरात ज्यानंतर एकच हंगामा झाला. २८ जण या सगळ्या राड्यामध्ये जखमी झाले. पोलीस आणि वकील भिडल्याने अनेक कर्मचारी आणि कैदी न्यायालयात अडकले होते.

Leave a Comment