खिशात फक्त 3 रूपये आणि अचानक सापडले 40 हजार रूपये, या व्यक्तीने काय केले बघा

खिशात केवळ 3 रूपये असतील आणि समोर 40 हजार रूपये सापडले तर चांगल्या चांगल्या माणसांचे इमान टिकायचे नाही. मात्र सातारा येथील धनाजी जगदाळे यांनी अशा परिस्थितीमध्ये देखील इमान राखले.

छोटे मोठे काम करून पोट भरणाऱ्या 54 वर्षीय धनाजींना दिवाळीच्या दिवशी बसस्टॉपवर 40 हजार रूपये सापडले आणि त्यांनी त्यातील एकही रूपया न घेता ते पैसे मालकापर्यंत पोहचवले. धनाजी यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे एक उदाहरणच लोकांसमोर ठेवले आहे.

जगदाळे यांच्या या इमानदारीने प्रभावित होऊन पैशांचा मालक त्यांना बक्षीस म्हणून 1 हजार रूपये देखील देत होता. मात्र त्यांनी केवळ 7 रूपयेच स्विकारले. कारण त्यांच्या खिशात 3 रूपये होते व त्यांना त्यांचे गाव पिंगाली येथे जाण्यासाठी लागणारे भाडे 10 रूपयांचीच गरज होती.

जगदाळे यांनी सांगितले की, मी दिवाळीला कामानिमित्त दहिवाडीला गेलो होतो. परत येताना बसस्टॉपवर आलो तर माझ्याजवळ पैशांचा बंडल पडलेला होता. मी आजुबाजूला विचारले, त्याच वेळी एक व्यक्ती चिंतित होऊन काहीतरी शोधत होता. मला लक्षात आले की, हे पैसे त्यांचेच आहेत. त्या व्यक्तीला मी पैसे दिले. त्यांनी त्यांच्या पत्नीच्या ऑपरेशनसाठी ते पैसे ठेवले होते. त्यांनी मला त्यातील 1 हजार रूपये देखील देण्याचा प्रयत्न केला. मात्र मी केवळ 7 रूपये घेतले. कारण माझ्या गावाला जाण्याचे भाडे 10 रूपये आहे व माझ्या खिशात 3 रूपये होते.

ही घटना समोर आल्यानंतर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले आणि अन्य लोकांनी जगदाळे यांचा सत्कार केला. धनाजी यांचा हा प्रामाणिकपणा बघून आणखी एका व्यक्तीने 5 लाख रूपये बक्षीस म्हणून देण्याचा निर्णय घेतला. मात्र ही रक्कम देखील त्यांनी नम्रपणे नाकारली.

Leave a Comment