कोल्हापुरात लंगोट वाटून चंद्रकांत पाटलांचा निषेध


कोल्हापूर – कोल्हापूरकर कधी काय करतील याचा काही नेम नाही. त्यातच त्यांची निषेध व्यक्त करण्याची पद्धतच काही औरच आहे. त्याचाच प्रत्यय काहीसा नुकताच आला आहे. कोथरूड मतदारसंघातील महिलांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीच्या निमित्ताने साड्या वाटल्या म्हणून त्यांच्याविरोधात कोल्हापुरात उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन साड्या वाटल्याचा निषेध करत चक्क लंगोट वाटून करण्यात आले. कोल्हापुरातील मोतीबाग तालमीतील पैलवानांना राजर्षी शाहू संघटनेतर्फे लंगोट वाटण्यात आले. राजर्षी शाहू संघटनेच्या बाजीराव साळोखे आणि धैर्यशील साळोखे यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे.

कोथरूडमध्ये 1 लाख महिलांना दिवाळीच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साड्या वाटल्या यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. याचा राजर्षी शाहू संघटनेच्यावतीने कोल्हापुरातसुद्धा निषेध व्यक्त करण्यात आला. आमच्यासमोर कोणताही पैलवान शिल्लक राहिला नाही, अशा प्रकारचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. शिवाय निवडून आल्यानंतर कोथरूडमधील महिलांना साड्या वाटल्या. याचाच आम्ही निषेध करत असल्याचे आंदोलन बाजीराव साळोखे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. हे आंदोलन होऊ नये यासाठी आमच्यावर काही कार्यकर्त्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. पण, आम्ही त्यांना न जुमानता लंगोट वाटून आमचा निषेध व्यक्त केल्याचे धैर्यशील साळोखे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment