हेरगिरी प्रकरणी व्हॉट्सअॅपचे सरकारला उत्तर


नवी दिल्ली : देशभरात व्हॉटसअॅपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली असून याप्रकरणी व्हॉटसअॅपला नोटीस पाठवून सरकारने उत्तर देण्यास सांगितले होते. कंपनीने यावर म्हटले आहे की, कंपनीने सरकारला हेरगिरीबाबत यावर्षी मे महिन्यात कल्पना दिली होती. अनेक देशांमधील अधिकारी, पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांचे फोन एका इस्रायलच्या स्पायवेअरच्या मदतीने हॅक करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवरच हल्लाबोल करत हेरगिरी केल्याचा आरोप केला आहे.

शुक्रवारी व्हॉटसअपने जाहीर केले की, आमचे प्राधान्य कोणत्याही युजरची गोपनीयता आणि सुरक्षा याला असते. हे प्रकरण आम्ही सोडवले होते. तसेच भारतासह इतर देशांच्या सरकारला याबाबत सावधही केले होते. मोबाइल स्पायवेअरच्या मदतीने हॅक केल्याचे प्रकरण वाढल्यानंतर माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 2011 ते 2013 या काळात तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि जनरल व्ही के सिंग यांची हेरगिरी झाल्याचे सांगत व्हॉटसअॅपकडे उत्तर मागितले होते. याशिवाय भारतातील पत्रकार, मानवाधिकार यांचेही फोन हॅक झाले आहे.

व्हॉटसअॅप सर्व्हरचा वापर केल्याचा आऱोप एनएसओ कंपनीवर आहे. 29 एप्रिल 2019 ते 10 मे 2019 या कालावधीत त्याच्या माध्यमातून 1 हजार 400 युजर्सच्या मोबइल फोनवर मालवेअर अटॅक करण्यात आला. त्यातून हेरगिरी करण्यात आली. यामध्ये 20 देशांमधील पत्रकार, सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते यांचा समावेश आहे

अमेरिका, युएई, बहरीन, मेक्सिको, पाकिस्तान, भारत या देशांमधील लोकांचे फोन हॅक झाले. पण रॉयटर्स वृत्तसंस्थेने नेमके याच देशांमधील अधिकारी आणि लोकांचे फोन हॅक झाले. त्यांच्यावर पाळत ठेवली गेली हे निश्चितपणे सांगता येत नसल्याचे म्हटले आहे.

आपले व्हॉटसअॅप हॅक केल्याचे भारतातील मानवाधिकार कार्यकर्ता आणि वकील शालिनी गेरा यांनीही म्हटले आहे. टोरांटो युनिव्हर्सिटीच्या सिटिझन लॅबच्या जॉन स्कॉट रेल्टन यांनी गेल्या महिन्यात संपर्क केला होता. माझ्या फोनबाबतची माहिती जॉनने दिली. त्याची तपासणी करण्यासही मला सांगितले असे गेरा यांनी म्हटले. एल्गार परिषदेच्या प्रकरणात आरोपी असलेल्या सुधा भारद्वाज यांचा बचाव करणाऱ्यांपैकी गेरा या एक आहेत.

Leave a Comment