शिवसेनेची आता काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा सुरू: माधव भंडारी


मुंबई: सत्तावाटपावरुन भाजप-शिवसेनेतील रस्सीखेच सुरूच असून मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील 50-50 च्या वाट्यावर शिवसेना अडून बसली आहे. तर दुसरीकडे आमदारांच्या संख्येनुसार भाजपही सत्तेची विभागणी करण्यावर भर देत आहे. आता भाजपचे नेते माधव भंडारी यांनी एक नवा खुलासा केला आहे. भाजपने नाही, तर शिवसेनेने सत्तास्थापनेची चर्चा थांबवल्याचे सांगत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी शिवसेना चर्चा करत असल्याचे माधव भंडारी यांनी म्हटले आहे.

माधव भंडारी म्हणाले, कोण काय बोलत आहे याला काही अर्थ नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे चर्चा आम्ही थांबवलेली नाही, तर शिवसेनेनेच थांबवली आहे. कारण ते आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. महायुतीच्या नावाने आम्ही मत मागितली असल्यामुळे आम्ही शिवसेनेसोबतच जाणार आहोत आणि शपथविधी लवकरच पार पडेल.

भाजपला विधानसभा निवडणुकीच्या निकालाने शिवसेनेच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करणे शक्यच नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पावर वाढली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून थेट मुख्यमंत्री पदालाच लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्रीपद नाही, पण महत्त्वाची खाती तरी पदरात पाडून घेण्यात शिवसेना यशस्वी होताना दिसत आहे. यात शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अस्पष्ट भूमिकेचाही चांगलाच फायदा झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment