आता या व्यवहारांसाठी आवश्यक झाले पॅनकार्ड


नवी दिल्ली – कोणत्याही व्यक्तीच्या, भागीदारी संस्थेच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये आयकर विभागाकडून देण्यात येणारे पॅनकार्ड हे महत्त्वाचा दस्तावेज आहे. पॅनकार्ड तुम्ही एकदा काढल्यावर ते आयुष्यभरासाठी वैध असते. तुम्ही राहण्याचा पत्ता बदलला तरी पॅनकार्डच्या वैधतेमध्ये काहीही बदल होत नाही. तुम्ही तुमच्या राहण्याचा पत्ता नंतर पॅनकार्डवर बदलूही शकता. पॅनकार्ड नंबर विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारने पॅनकार्ड भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी बंधनकारक केले आहे.

आता या व्यवहारांसाठी पॅनकार्ड असेल बंधनकारक
१. जर तुम्ही गाडीची खरेदी किंवा विक्री विकणार असाल तर पॅनकार्ड बंधनकारक आहे.
२. पॅनकार्ड बॅंकेत खाते उघडण्यासाठी बंधनकारक आहे.
३. पॅनकार्ड डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना बंधनकारक आहे.
४. डिमॅट खाते सुरू करताना पॅनकार्ड आवश्यक आहे.
५. जर तुम्ही एखाद्या हॉटेल किंवा रेस्तराँमध्ये ५० हजारांपेक्षा जास्तीचे बिल रोख स्वरुपात एकाच टप्प्यात देत असाल तर पॅनकार्ड आवश्यक आहे.
६. जर परदेशात फिरायला जाण्यासाठी ५० हजार किंवा त्या पेक्षा जास्त रकमेचा व्यवहार रोख स्वरुपात करीत असाल तर पॅनकार्ड बंधनकारक आहे.
७. बँकेत एकाच दिवशी ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्तीची रक्कम रोख स्वरुपात भरत असाल तर पॅनकार्ड आवश्यक आहे.
८. जर ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे म्युचुअल फंड्स, बॉण्ड्स घेत असाल तर पॅनकार्ड आवश्यक
९. एकाच दिवशी ५० हजार किंवा त्या पेक्षा जास्त रक्कम रोख स्वरुपात कोणाला देत असाल तर पॅनकार्ड आवश्यक आहे.
१०. जीवन विम्यासाठी आर्थिक वर्षात ५० हजारांपेक्षा जास्त रकमेचा प्रिमियम दिला तर त्यावेळी पॅनकार्डचा उल्लेख करणे बंधनकारक आहे.
११. दोन लाखांपेक्षा जास्तीच्या कोणत्याही व्यवहारासाठी पॅनकार्ड बंधनकारक आहे.
१२. दहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी पॅनकार्ड बंधनकारक आहे.

तुमच्याकडे जर पॅनकार्ड नसेल तर फॉर्म ६० भरून तुम्ही तुमचा संबंधित व्यवहार पूर्ण करू शकता. हा फॉर्म म्हणजे एक प्रकारे निवेदनच असते. ज्यामध्ये तुमचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असल्याचे तुम्ही नमूद करता. त्याचबरोबर तुम्ही जर पॅनकार्ड काढले असेल आणि ते सापडत नसेल किंवा तुमचा पॅनकार्ड नंबर तुम्हाला आठवत नसेल तर त्यावेळी तुम्ही व्यवहारात आधारकार्ड नमूद करू शकता. तिथे आधारकार्ड चालते. पण पॅनकार्ड काढले असेल तरच हे शक्य आहे.

Leave a Comment