कर्तारपूरला उदघाटनासाठी मला जाऊ दे न व


नवी दिल्ली – कर्तारपूर कॉरिडॉर उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती काँग्रेसचे नेते आणि पंजाबमधील आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे केली आहे. त्यांनी ही विनंती जयशंकर यांना पत्र लिहून केली आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, मला पाकिस्तानने येत्या ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या श्री कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या उदघाटन कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे. माझ्यासाठी या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणे अभिमानाचा आणि श्रद्धेचा क्षण असल्यामुळेच या पवित्र कामासाठी मला पाकिस्तानला जाण्याची परवानगी मिळावी, असे त्यांनी पत्रामध्ये लिहिले आहे.

शीख बांधवांचे कर्तारपूरमधील दरबार साहिब गुरुद्वारा हे श्रद्धास्थान आहे. कर्तारपूरमधील हा गुरुद्वारा आणि पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक गुरुद्वारा यांना जोडण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये करारही करण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या ठिकाणी जाणाऱ्या शीख बांधवांसाठी दोन खास सवलती जाहीर केल्या. यामध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी पासपोर्ट बाळगण्याची गरज पडणार नाही. इतर कोणतेही सरकारी ओळखपत्र फक्त भाविकांकडे असले पाहिजे. त्याचबरोबर कर्तारपूरला जाण्यासाठी १० दिवस आधी नावनोंदणी करण्याची अटही रद्द करण्यात आली.

Leave a Comment