चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी पुन्हा प्रयत्न करणार इस्रो


नवी दिल्ली – शेवटच्या टप्प्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेला अपयश आले असले तरी पुन्हा एकदा चंद्रावर लवकरच सॉफ्ट लँडिंगसाठी प्रयत्न केले जातील, असे इस्रोचे प्रमुख डॉ. के शिवन यांनी म्हटले आहे. पण त्यांनी याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. चांद्रयान मोहिमेमध्ये विक्रम लँडर गेल्या सप्टेंबर महिन्यात चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. पण विक्रम लँडरचा मोहिमेच्या अगदी अंतिम टप्प्यात इस्रोच्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला होता.

के शिवन दिल्लीमध्ये दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पदवीप्रदान समारंभासाठी आले होते. त्यांनी या कार्यक्रमात चांद्रयान २ मोहिमेनंतरच्या घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले, आमच्याकडे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी असलेले तंत्रज्ञान जगापुढे दाखवले गेले पाहिजे. आम्ही त्यासाठी एक आराखडा तयार करत आहोत. पण या माध्यमातून पुन्हा मोहिम कशी आखायची हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

सध्या इस्रोकडून चांद्रयान २ मोहिमेतील चंद्राभोवती फिरत असलेल्या ऑर्बिटरच्या माध्यमातून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. चांद्रयान २ मोहिमेतील प्रक्षेपकांना २२ जुलै रोजी चंद्राच्या दिशेने उड्डाण केले होते. पण या मोहिमेतील विक्रम लँडरचा इस्रोच्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटल्यामुळे ही मोहिम अंतिम टप्प्यात अपयशी ठरली.

Leave a Comment