तृप्ती देसाईंना धमकावल्याप्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल


पुणे : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात बच्चू कडूंवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या 31 ऑक्टोबरला फेसबुकवर तृप्ती देसाई यांनी एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी या पोस्टमध्ये स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे बच्चू कडू शिवसेना आणि भाजप विरोधात आंदोलन का करत नाहीत, विदर्भातील शेतकरी अडचणीत आहेत, असा सवाल केला होता. बच्चू कडू यांच्या समर्थकांनी तसेच, प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी तृप्ती देसाईंच्या या पोस्टवर त्यांना फेसबुकवर शिवीगाळ आणि बदनामीकारक मजकूर लिहित अनेक वाईट कमेंट केल्या होत्या.

तृप्ती देसाई आणि बच्चू कडू यांच्यात त्यानंतर फोनवर संवाद झाला. बच्चू कडू आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये यादरम्यान बाचाबाचीही झाली. बच्चू कडू यांच्याकडून त्यानंतर धमकी दिल्याची तक्रार तृप्ती देसाईंनी केली आहे. या संवादादरम्यान, तुम्ही मला फेसबुकवर उपदेश करू नका, स्वतःला मोठे समजू नका, अती शहाणपणा करू नका, अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी बच्चू कडू यांनी दिल्याचा उल्लेख तृप्ती देसाई यांनी तक्रारीत केला आहे.

Leave a Comment