व्होडाफोन आपला काशागोशा गुंडाळण्याच्या तयारीत ?


नवी दिल्ली – भारतातील आपला व्यवसाय दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्होडाफोन बंद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सततच्या होणाऱ्या तोट्यामुळे व्होडाफोन कंपनी हा निर्णय घेऊ शकते. यासंदर्भातील वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे. पण कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

रिलायन्स जिओने दोन वर्षांपूर्वी दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर मोफत कॉलिंग आणि अन्य सुविधांमुळे इतर दूरसंचार क्षेत्रातील अन्य कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तर या शर्यतीत काही कंपन्यांना टिकाव धरता आला नसल्याने आपला व्यवसाय गुंडाळण्याचा त्यांनी देखील निर्णय घेतला होता. तसेच व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचे यानंतर विलीनीकरण देखील झाले होते. व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्या सध्या एकत्रित सेवा पुरवत आहे. परंतु आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही क्षणी आपला भारतातील व्होडाफोन व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे. कंपनी हा निर्णय ऑपरेशनल लॉस आणि कॅपिटलायझेशनमध्ये आलेली कमी यामुळे घेण्याची शक्यता असल्यामुळेच कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटादेखील सहन करावा लागत आहे.

व्होडाफोनने गेल्या काही महिन्यांमध्ये आपले लाखो ग्राहक गमावल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर कंपनीला या तिमाहीतही मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. त्यातच कंपनीची स्टॉक मार्केट व्हॅल्यूदेखील कमी होत आहे. कंपनीला जून २०१९ मध्ये जून २०१८ च्या तुलनेत दुप्पट म्हणजेच ४ हजार ६७ कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागला होता.

दरम्यान, ‘अॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू’वर (एजीआर) दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन आयडिया कंपनीला २८ हजार ३०९ कोटी रूपयांचा भरणा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर यावर कंपनी पुवर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. तसेच कंपनीला यावर दिलासा न मिळाल्यास कंपनीचा पुढील मार्ग खडतर असल्याचेही आयएएनएसच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment