शास्त्रीबुवांना कामाला लावणार सौरव गांगुली


कोलकाता : सौरव गांगुलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर आणखी एक नवी जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. गांगुलीने म्हटले आहे की, एक अशी व्यवस्था राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तयार करण्यात येईल की जिथे रवी शास्त्री जास्त वेळ घालवू शकतील. बेंगळुरूत एका मोठ्या क्रिकेट अकादमीची उभारणी बीबीसीआय करत आहे. बुधवारी एनसीए प्रमुख राहुल द्रविड आणि इतर सदस्यांसोबत गांगुली आणि इतर नव्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली होती.

गांगुली म्हणाला की, अशी व्यवस्था आम्ही तयार करू इच्छितो ज्यामुळे जोपर्यंत रवी शास्त्री प्रशिक्षक आहेत तोपर्यंत जास्ती जास्त वेळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला देतील. आमचा येथे एक चांगले सेंटर तयार करण्याचा प्रयत्न आहे. तसेच ते एनसीए प्रमुख आहेत. प्रत्यक्षात एनसीए कसे काम करते हे जाणून घ्यायचे होते. आम्ही सध्या नवीन एनसीए तयार करत असून त्यांना मी वेगवेगळे भेटलो आहे. मला वाटते की एनसीएमध्ये ते खूप काम करत आहेत.

शास्त्री आणि गांगुली यांच्यातील संबंध सर्वश्रृत आहेत. अनिल कुंबळेला 2016 साली प्रशिक्षक केल्यानंतर हे उघड झाले होते. त्यावेळी सचिन, लक्ष्मण आणि गांगुली प्रशिक्षक निवडीसाठीच्या समितीमध्ये होते. शास्त्री आणि कुंबळे यांच्यापैकी त्यावेळी कुंबळेची निवड करण्यात आली होती. प्रशिक्षक निवडीवेळी शास्त्रींच्या मुलाखती दरम्यान गांगुली उपस्थित राहिला नव्हता. त्यावेळी शास्त्रींनी हे अपमानास्पद असल्याचे म्हटले होते. त्यावर गांगुलीने जोरदार प्रत्युत्तर देत शास्त्री वेगळ्याच जगात असल्याचे म्हटले होते.

Leave a Comment