या दिवशी मोठ्या पडद्यावर होणार पानिपत


नुकतेच भारतीय इतिहासाला कलाटणी देणाऱ्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित पानिपत या चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील त्यासोबतच सांगण्यात आली असून हा चित्रपट येत्या 6 डिसेंबरला रिलीज करण्याचा निर्णय चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या रिलायन्स एंटरटेनमेंटने घेतला आहे.

अर्जुन कपूर, कृती सेनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे, मोहनिश बेहेल, यांच्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. ज्या युद्धानंतर मराठा साम्राज्याचा अस्त सुरू झाला त्या युद्धावर आधारित हा चित्रपट आहे.

मराठा साम्राज्याचे सदाशिवरावभाऊ पेशवे आणि अफगाण बादशहा मोहम्मद शहा अब्दाली यांच्यात झालेल्या युद्धात मोठे नुकसान झाले होते. या युद्धात जवळपास 1 लाख मराठे मारले गेले. पण त्याचबरोबर देशाच्या राजकारणाला एक नवीन कलाटणी मिळाली. या चित्रपटाद्वारे यावर भाष्य करण्यात येणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट, रोहित शेलटकर आणि सुनीता गोवारीकर यांनी मिळून केली आहे. या चित्रपटाची सुरुवातीपासूनच प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटाला ऍक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स यांचीही जोड मिळणार असल्यामुळे आता सगळेच आतुरतेने 6 डिसेंबरची वाट पाहतील यात काहीच शंका नाही.

Leave a Comment