डासांचा प्रादुर्भाव


गेल्या दहा-बारा वर्षात भारतात डासांपासून फैलावल्या जाणार्‍या विकारांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. वास्तविक पाहता ही शहरीकरणाची देणगी आहे. म्हणजे आपण शहरीकरण तर करत आहोत परंतु शहरीकरणामुळे वाढणारी गर्दी, लोकसंख्येची वाढणारी दाटी आणि त्याप्रमाणात अपुर्‍या स्वच्छतेच्या सोयी यातून हे विकार भराभर वाढत चालले आहेत. दिल्लीमध्ये गेल्या वर्षी उन्हाळा संपताच चिकन गुनिया आणि डेंग्यूचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्याच्याशी सामना करणे तिथल्या सरकारला फार समर्थपणे शक्य झाले नव्हते. त्याच पध्दतीने यंदासुध्दा डासांचे आणि त्यांच्यापासून फैलावणार्‍या रोगांचे प्रादुर्भाव झालेले दिसत आहेत. दरवर्षी साधारणतः जूनमध्ये हे विकार वाढायला लागतात. कारण जूनमध्ये पाऊस पडतो आणि पाऊस पडला की जागोजाग डबकी साचून त्यात डासांचा उद्भव होतो.

यंदा मात्र पावसाळा अजून लांब असतानाच देशाच्या विविध भागांमध्ये आणि राजधानी दिल्लीतसुध्दा चिकन गुनियाचा तसेच मलेरिया आणि डेंग्यूचाही प्रकोप झालेला दिसत आहे. खरे म्हणजे एवढ्या कडक उन्हाळ्यात असा डासांपासून होणार्‍या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. परंतु गेल्या आठवड्यात झालेला पाऊस आणि त्यामुळे साचलेले पाणी यामुळे पावसाळा लांब असतानाच डेंग्यूचा उद्भव झाला आहे. ८ एप्रिल रोजी म्हणजे एकाच दिवसात दिल्लीच्या विविध रुग्णालयांमध्ये चिकन गुनियाचे ७९, डेंग्यूचे २४ आणि मलेरियाचे १३ रुग्ण दाखल झाले आहेत. गतवर्षी याच दिवशी दाखल झालेल्या या विकारांच्या रुग्णांची संख्या यावर्षीच्या संख्येपेक्षा चौपटीने कमी होती. हा आकडा पाहिला म्हणजे दिल्लीतला या विकारांचा प्रादुर्भाव किती मोठा आहे याचा अंदाज येतो.

हे सगळे विकार फैलावू नयेत आणि डासांचा उद्भव होऊ नये यासाठी प्रयत्न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे हे कोणी नाकारत नाही. परंतु या विकारांच्या संदर्भात वारंवार एक गोष्ट आढळून आली आहे आणि ती केवळ दिल्लीपुरतीच नव्हे तर पूर्ण देशात आढळून आली आहे की या विकारांचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारपेक्षासुध्दा सामान्य जनता जास्त प्रभावीपणे काम करू शकते. कारण या विकारांमध्ये विकार झाल्यानंतरच्या उपायांपेक्षासुध्दा पूर्व काळजी घेणे जास्त आवश्यक आहे आणि याबाबत केवळ दिल्ली नव्हे तर पूर्ण देशामध्ये जनजागृतीची मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment