व्हॉट्सअ‍ॅप हेरगिरी : केवळ एका मिसकॉलद्वारे चोरली जात होती संपुर्ण माहिती

इस्त्रायलच्या स्पायवेअर ‘पिगासस’द्वारे व्हॉट्सअ‍ॅपवरील भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणामुळे भारतीयांच्या खाजगीपणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या स्पायवेअरद्वारे केवळ एका मिसकॉलद्वारे मोबाईल डिव्हाईसमधील सर्व डाटा चोरी केला जातो.

मे मध्ये समोर आले प्रकरण –

कॅलिफोर्नियाच्या जिल्हा न्यायालयात व्हॉट्सअ‍ॅपने पिगासस डेव्हलप करणाऱ्या एनएसओ ग्रुपविरोधात तक्रार दाखल केली. या मालवेअरने व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंगद्वारे डिव्हाईसवर हल्ला करत 1400 लोकांची माहिती चोरी केली. या मालवेअरची माहिती मिळताच 13 मे ला व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्सला अ‍ॅप त्वरित अपडेट करण्याची सूचना दिली होती. यामध्ये वकील, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांना टार्गेट करण्यात आले. व्हॉट्सअ‍ॅपने आरोप केला आहे की, यामुळे त्यांचे नावलौकिक खराब झाले असून, यामुळे  त्यांचे 75 हजार डॉलरचे नुकसान झाले आहे.

तपासणी केल्यावर समोर आले की, जानेवारी 2018 ते मे 2019 दरम्यान एनएसओने व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तयार केले. या अकाउंटद्वारे मालवेअर पाठवण्यात आले. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बनविण्यासाठी सायप्रस, इस्त्रायल, ब्राझील, इंडोनेशिया, स्वीडन आणि नेदरलँडमधील रजिस्टर नंबरचा वापर करण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, पिगाससला सोशल मीडिया साइटवर होणाऱ्या कमिन्युकेशनमध्ये अडचणी आणण्यासाठी तयार करण्यात आले आहे. युजर्सला निशाणा बनविल्यानंतर हे स्पायवेअर मागे कोणतेही अस्तित्व सोडत नाही.

व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख विल कॅचकार्ट यांनी एका लेखात लिहिले की, मे मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले होते की, कंपनीने नवीन प्रकारच्या सायबर हल्ल्याचा शोध घेतला असून, त्याला ब्लॉक करण्यात आले आहे. हा मालवेअर व्हिडीओ कॉलिंग फीचरमध्ये होता. फोनवर मिसकॉल देऊन स्पायवेअर टाकण्यासाठी मालवेअर कोड ट्रांसमिट केला जात असे.

Leave a Comment