दिग्गज टेक कंपनी अॅपलचे सीईओ टिम कूक यांचा आज (1 नोव्हेंबर) वाढदिवस आहे. टिम कूक यांचा जन्म 1960 ला झाला होता. एकेकाळी पेपर विकणारे टिम कूक 8 वर्षांपासून अॅपलच्या सीईओ पदावर कार्यरत आहेत. खूप कमी जणांना माहिती आहे की, कूक यांचे संपुर्ण नाव टिमोथी डोनाल्ड कूक हे आहे.
जाणून घ्या टीम कूक यांचा वृत्तपत्र विक्रेता ते अॅपलचे सीईओपर्यंतचा प्रवास
कूक यांनी अनेक वर्ष फार्मेसीमध्ये देखील काम केले आहे. यूकारी इवाटनी केन यांचे पुस्तक ‘हॉन्टेड इम्पायर- अॅपल अफ्टर स्टिव्ह जॉब्स’ यानुसार, टिम कूक यांनी पहिली नोकरी पेपर विकण्याची केली होती. ते लोकांच्या घरोघरी जाऊन वृत्तपत्र देण्याचे काम करत असे.
कूक यांनी ऑबर्न युनिवर्सिटीमधून औद्योगिक इंजिनिअरिंगमधून पदवी घेतली. त्यानंतर ड्यूक युनिवर्सिटीमधून त्यांनी एमबीएचे शिक्षण पुर्ण केले. आयबीएममध्ये 12 वर्ष काम केल्यानंतर अखेर 1998 मध्ये कूक अॅपलमध्ये आले.
वर्ष 2000 मध्ये ते अॅपल कंपनीत सेल्स आणि मॅनेजमेंट विभागात व्हाईस प्रेसिडेंट होते. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी मॅकिन्टोश विभागात अंतरिम सीईओ आणि प्रमुख पद स्विकारले. 2009 मध्ये स्टिव्ह जॉब्स यांच्या आजारपणामुळे कूक यांची कंपनीचे अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ऑगस्ट 2011 मध्ये स्टिव्ह जॉब्स यांच्या मृत्यूनंतर कूक यांनी अॅपलचे सीईओ बनविण्यात आले. त्यांना 2014 मध्ये 84 कोटी रूपये बोनस स्वरूपात मिळाले होते. सीईओ पद सांभाळल्यानंतर कूक यांनी ते ‘गे’ असल्याचे सांगितले होते.
कूक आपल्या फिटनेससाठी देखील ओळखले जातात. ते सकाळी 3.45 वाजता उठतात. त्यानंतर 5 वाजता जिमला जातात. त्यानंतर सकाळी 8 वाजता आलेले सर्व मेल चेक करतात. आज ते 44 अब्ज रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. वृत्तपत्र विक्रेता ते जगातील सर्वात मोठी टेक कंपनी अॅपलचे सीईओ असा टिम कूक यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.