कृषी पर्यटन


देशातल्या शेतकर्‍यांना स्वावलंबी बनवायचे असेल तर त्यांना विविध प्रकारचे जोडधंदे उपलब्ध करून दिले पाहिजेत असे वारंवार सांगितले जाते. अशा जोडधंद्यांमध्ये अलीकडच्या काळात कृषी पर्यटन नावाचा एक जोडधंदा वेगाने पुढे येताना दिसत आहे. त्याला अधिक गती मिळावी यासाठी जागतिक पातळीवर आज म्हणजे १६ मे रोजी जागतिक कृषी पर्यटन दिन पाळला जात आहे. या निमित्ताने या व्यवसायाचे स्वरूप, फायदे आणि त्यातील संधी याचा मोठ्या प्रमाणावर विचार केला जात आहे. भारतामध्ये बहुसंख्य लोक शेतीशी निगडित आहेत, असे वारंवार म्हटले जाते परंतु हळूहळू शेती करणार्‍यांची संख्या कमी होत आहे आणि देशातले जवळपास ५० टक्के लोक शेतीपासून आणि पर्यायाने निसर्गापासून दूर चालले आहेत.

परिस्थितीनुसार आणि बदलत्या जीवनशैलीनुसार हे लोक शेतीपासून दूर जात असले तरी त्यांच्या मनातले निसर्गाविषयीचे आकर्षण कमी झालेले नाही. कधीतरी शेतात जावे, हिरव्या पिकातून फिरावे, कालव्यातल्या पाण्यातून नाचावे, विहिरीत डुंबावे, बैलगाडीतून सफर करावी आणि हिरव्यागार आंब्याच्या झाडाखाली निसर्गातला थंडावा अनुभवत शांतपणे झोपावे, असे प्रत्येकालाच मनातून वाटते. एकदा अशी झोप संपली की उठून हुरडा खावा, चुलीवर भाजलेली गरम भाकरी आणि चवदार वांग्याची भाजी यांच्यावर ताव मारावा असेही प्रत्येकाल वाटते. अशा प्रकारे शेतात एक दिवस काढला की माणूस ताजातवाना होता आणि शहरातल्या आपल्या धकाधकीच्या जीवनातील दगदग सहन करण्याची नैसर्गिक ऊर्जा त्याला मिळते.

शहरातल्या लोकांचे असे थंड हवेत येणे शेतकर्‍यांनाही फायदेशीर ठरू शकते. त्यातून त्यांचा कृषी पर्यटन हा व्यवसाय होतो. शहरातल्या लोकांना शेतातली मजा उपभोगता यावी यासाठी काही विशेष सोयी शेतकर्‍यांनी आपल्या शेतात निर्माण केल्या तर त्याला त्यातून चांगले उत्पन्नही होऊ शकते आणि एक प्रकारचा जोडधंदा उपलब्ध होतो. शहरातला माणूस अशा प्रकारच्या एक दिवसाच्या शेताच्या सफरीसाठी शेतकर्‍याला दरडोई ५०० ते १००० रुपये सहज देऊ शकतो जे त्या शेतकर्‍यासाठी खूप असतात. अमेरिकेत हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. अमेरिकेतील मनुष्यबळाचा ६ टक्के इतका हिस्सा कृषी पर्यटनात रोजगार कमवत असतो. भारतातही असे होऊ शकते आणि शेतकर्‍यांना एक वेगळाच जोडधंदा उपलब्ध होऊ शकतो.

Leave a Comment