अजबच ! पोलिसांच्या विशेष सुरक्षेत गँगस्टर जेलमध्येच विवाहबद्ध

सर्वसाधारणपणे पंजाबच्या नाभा येथील कारागृह परिसरात शांतता पसरलेली असते. मात्र बुधवारी या ठिकाणी बँड-बाजाचे आवाज ऐकू येवू लागले. त्याला कारणही तसेच खास होते. दुहेरी हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर मनदीप सिंहने कारागृहात लग्न केले. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून विशेष सुरक्षेत त्याचे लग्न लावण्यात आले.

लाल रंगाचा ड्रेस घालून नवरी देखील आपल्या कुटूंबाबरोबर बुधवारी सकाळी 9 वाजता कारागृहात दाखल झाली. याचबरोबर मनदीपचे नातेवाईक देखील लग्नासाठी उपस्थित होते. यावेळी कारागृह प्रशासनाकडून सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली. कारागृहातील गुरूद्वारा साहिब येथे मनदीपचा पवनदीप कौर सोबत विवाह लावण्यात आला.

गँगस्टर मनदीप सिंहने उच्च न्यायालयात पॅरोल देण्याची देखील मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पॅरोल देण्यास नकार दिला होता व कारागृह प्रशासनाला 30 ऑक्टोंबरपर्यंत मनदीपचा विवाह लावून देण्याचे आदेश दिले होते. कारागृहात यासाठी तयारी देखील करण्यास सांगण्यात आले होते.

गँगस्टर मनदीप सिंहने मोगा येथील सरपंच आणि त्याच्या गनमॅनची गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. याशिवाय त्याच्याविरोधात आणखी 8 तक्रारी देखील दाखल आहेत.

 

Leave a Comment