जगातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप-10 सीईओंमध्ये भारतीय वंशाचे तीन व्यक्ती


नवी दिल्ली : जगात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सीईओंची २०१९ ची यादी हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने (एचबीआर) जाहीर केली आहे. भारतीय वंशाच्या तीन सीईओंनी या यादीत टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे. एडोबीचे शांतनू नारायण भारतीय वंशाच्या सीईओंत सहाव्या स्थानासह सर्वात वरच्या स्थानी आहेत. मास्टर कार्डचे सीईओ अजय बंगा सातव्या आणि मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला नवव्या स्थानी आहेत.

या यादीत पहिल्या स्थानी अमेरिकेची तंत्रज्ञान कंपनी एनव्हिडियाचे सीईओ जेनसेन हुआंग आहेत. एकूण १०० सीईओंचा या यादीत समावेश आहे. या यादीत स्थान मिळ‌वणारे डीबीएसचे सीईओ पीयूष गुप्ता चौथे भारतवंशी आहेत. ८९ वे स्थान त्यांना मिळाले आहे. यादीत ६२ व्या स्थानी अॅपलचे सीईओ टीम कूक आहेत.

नाइकीचे सीईओ माइक पार्कर एचबीआरच्या यादीत २० व्या, जेपी मॉर्गन चेजचे सीईओ जॅमी डिमोन २३ व्या लॉकहीड मार्टिनच्या सीईओ मॅरिलिन ह्युसन ३७ व्या, डिज्नीचे सीईओ रॉबर्ट इगर ५५ व्या आणि सॉफ्टबँक प्रमुख मासायोशी सन ९६ व्या स्थानावर आहेत.

एचबीआरने म्हटले आहे की, २०१८ च्या अखेरीस ही यादी बनवण्याची सुरुवात झाली. तेव्हा एस अँड पी ग्लोबल १२०० मध्ये असलेल्या कंपन्यांचा यात समावेश करण्यात आला. जगभरातील शेअर बाजारातील सुमारे ७० टक्के भांडवल हा निर्देशांक दर्शवतो. उत्तर अमेरिका, युरोप, आशिया, लॅटीन अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या कंपन्यांचा यात समावेश आहे. यादी तयार करताना सीईओंच्या कामगिरीचे तीन निकषांवर विचार करण्यात आला आहे. यात त्यांच्या कार्यकाळात समभागधारकांना मिळणारा परतावा, बाजार भांडवलातील बदल याचा समावेश आहे. चार महिला सीईओंना टॉप-५० मध्ये स्थान मिळाले आहे. ही संख्या मागील वर्षी तीन होती. या यादीत समाविष्ट असणारे सीईओ त्यांच्या वयाच्या ४५ व्या वर्षी या पदावर आले आणि सुमारे १५ वर्षे त्या पदावर राहिले.

या यादीत २०१४ पासून दरवर्षी केवळ आर्थिक कामगिरीच्या आधारावर अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस अव्वल स्थानावर होते. पण अमेझॉनचा ईएसजी स्कोअर यंदा अत्यंत कमी राहिला आणि या यादीत त्यांना स्थान मिळवता आले नाही. एचबीआर दरवर्षी जगात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सीईओंची यादी जाहीर करते.

सर्वोत्तम कामगिरी करणारे टॉप-10 सीईओ
1 जेनसेन हुआंग : एनवीडिया
2 मार्क बेनिओफ : सेल्सफोर्स
3 फ्रैंकोइस हेनरी: केरिंग
4 रिचर्ड टेंपलटन : टेक्सास इंस्ट्रूमेंट
5 इगांसियो गलान : आइबरड्रोला
6 शांतनू नारायण : एडोबी
7 अजय बंगा : मास्टरकार्ड
8 जोहान थिस : केबीसी
9 सत्या नडेला : मायक्रोसॉफ्ट
10 बर्नाड अररनॉत : एलबीएचएम

Leave a Comment