‘दबंग ३’मध्ये प्रीति झिंटाचा कॅमिओ?


काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या आगामी ‘दबंग ३’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. ट्रेलर पाहता चित्रपटाबाबतची चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता आता शिगेला पोहोचली. त्यातच आता एका गोष्टीची भर पडली आहे. ती म्हणजे अभिनेत्री प्रीति झिंटा ‘दबंग ३’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रीतिने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. प्रीति फोटोमध्ये पोलिसांच्या पोशाखात दिसत आहे. तर चुलबूल पांडे प्रीतिच्या शेजारी उभा असल्याचे दिसत आहे. मी यूपीमधील एका खास व्यक्तीला या हॅलोवीनमध्ये भेटले. ओळखा कोण आहे ही व्यक्ती? विचार करा आणि सांगा, असे कॅप्शन प्रीतिने फोटो शेअर करत दिले आहे.


प्रभू देवा दिग्दर्शित ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. दबंग चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे.

Leave a Comment