महिलेला दिले असे मेन्यू कार्ड की रेस्टोरेंटला बसला 44 लाखांचा दंड

पेरू येथील एक प्रसिध्द रेस्टोरेंटला तब्बल 44 लाख रूपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. या रेस्टोरेंटवर महिलेसोबत भेदभाव करण्याचा आरोप आहे. या हॉटेलमध्ये पुरूषांसोबत येणाऱ्या महिलांना असे मेन्यू कार्ड दिले जाते, ज्यात डिशेज सोबत त्याची किंमत लिहिलेली नसते. थोडक्यात रेस्टोरेंट असे समजते की, पुरूषसोबत असेल तर जेवणाचे बिल देखील तोच भरेल. त्यामुळे महिलांना किंमत दाखवण्याची गरज नाही.

या रेस्टोरेंटचे नाव ‘ला रोजा नौटिका’ असे असून, हे पेरूची राजधानी लिमा येथे आहे. रिपोर्टनुसार, रेस्टोरेंटमध्ये येणाऱ्या पुरूषांना निळ्या रंगाचे मेन्यू कार्ड दिले जाते, तर महिलांना सोनेरी रंगाचे मेन्यू कार्ड दिले जाते.

रेस्टोरेंट मालकाने याविषयी सांगितले की, आम्ही येथे येणाऱ्या महिलांसाठी चांगले वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडून देण्यात येणारे मेन्यू कार्ड हा एक संदेश आहे की, तुम्ही आनंदाने व अगदी निवांतपणे या क्षणाचा आनंद घ्या व पैशांची काळजी करू नका. मात्र पेरू प्रशासनाने हा तर्क मानण्यास नकार दिला आणि याला भेदभाच्या श्रेणीमध्ये ठेवत रेस्टोरेंटला दंड ठोठवला.

केवळ 62 हजार डॉलरचा दंडच नाही तर रेस्टोरेंटमधून भेदभाव करणारे मेन्यू कार्ड देखील हटवण्यास सांगितले. रेस्टोरेंटला भेदभाव सहन केला जाणार नाही, अशा आशयाचे पोस्टर देखील लावण्यास सांगितले आहे.

Leave a Comment