तब्बल 300 विमाने खरेदी करणार इंडिगो


मुंबई : तब्बल 300 विमानांची ऑर्डर भारतीय एअरलाइन्स कंपनी इंडिगोने दिली. विमान खरेदीची ही विक्रमी ऑर्डर एअरबस कंपनीला दिली आहे. विमान कंपनीला आतापर्यंत मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. ‘ए 320 निओ फॅमिली’ ची 300 विमाने खरेदी करण्याची ऑर्डर भारतीय एअरलाइन्स कंपनी इंडिगो कंपनीने दिली. ‘ए 320 निओ’, ‘ए 321 निओ’ आणि ‘ए 321 एक्सएलआर’ या विमानांच्या खरेदीच्या ऑर्डरचा या ऑर्डरमध्ये समावेश असणार आहे.

इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी विमान खरेदीविषयी बोलताना रोनोजॉय दत्त म्हणाले, कोणत्या एका एअरलाइनकडून एअरबस कंपनीला मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर असल्यामुळे आमच्यासाठी ही ऑर्डर अत्यंत महत्त्वाची आहे. आम्हाला भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात जलद विकास करण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांना अजून स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर योजनांची देखील आम्ही नव्याने आणणार आहोत.

यापूर्वी 2005 ते 2015 च्या काळात तीन टप्प्यांमध्ये 530 एअरबस विमानांची ऑर्डर इंडिगोने दिली होती. भारतातील हवाई क्षेत्रात जलद विकासाची अपेक्षा असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्याचे इंडिगोने म्हटले आहे. याद्वारे ग्राहकांना आणखी स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर योजनांची पूर्तता कंपनीकडून केली जाईल. तब्बल 33 अब्ज डॉलरचा (जवळपास 2.31 लाख कोटींचा) हा व्यवहार असू शकतो. याद्वारे शेअर बाजारातील आपले स्थान भक्कम करण्याचाही कंपनीचा प्रयत्न असेल.

Leave a Comment