‘हायकू स्टेअर्स’; कायमचा इतिहासजमा होणार एक साहसी रस्ता


होनूलोलू : स्वर्ग आहे याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. पण काही पर्यटकांना हवाईबेटांवर हायकू स्टेअर्स पाहून स्वर्गाचीच आठवण येते. या ठिकाणी स्वर्गात जाणारा मार्ग वाटावा अशा चार हजार पायऱ्या आहेत. या ठिकाणी जाण्यास बंदी असली तरी बंदी झुगारून लोक हायकू स्टेअर्स चढण्याचा प्रयत्न करतात. डोंगराच्या निमुळत्या टोकावरुन जाताना दिसणारी शिड्यांची पायवाट जणू काही स्वर्गात नेणाऱ्या पायऱ्या असल्याचा भास होतो. हवाई बेटांवरील केनोही डोंगरावर या ‘हायकू स्टेअर्स’ म्हणजे पायऱ्या आहेत.

जवळपास ३ हजार ९२२ एवढी स्वर्गाच्या जवळपास जाणाऱ्या पायऱ्यांची संख्या आहे. या पायऱ्या चढून जाणे हे तसे एकप्रकारचे आव्हान आहे. पण आजुबाजूचा निसर्ग आणि तेथील वातावरण पाहता. एकदा तरी स्वर्गाच्या वाटेवर जावे असे प्रत्येकाला वाटते. डोंगराच्या पायथ्यापासूनच्या या शिड्यामध्येच धुक्यात हरवतात. कधी कधी तर एखादा ढगच या पायऱ्यांवर विसावलेला दिसतो.

या पायऱ्या बांधल्या कुणी? हा प्रश्न आता तुमच्या मनात आला असेल पण या पायऱ्या अमेरिकेच्या नौसेनेने बांधल्या होत्या. या डोंगरावर १९४० साली दुसऱ्या महाय़ुद्धाच्या काळात एक रेडिओ स्टेशन बांधण्यात आले. अमेरिकेच्या नौसेनेकडून या रेडिओ स्टेशनद्वारे प्रशांत महासागरातील त्यांच्या जहाजांशी संपर्क प्रस्थापित केला जायचा.

हे रेडिओ स्टेशन कालांतराने बंद करण्यात आले. पण या रेडिओस्टेशनपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला. दररोज जवळपास ७५ पर्यटक १९७० साली या पायऱ्या चढून रेडिओ स्टेशनपर्यंत जायचे. पण नंतर १९८७ साली या पायऱ्यांवर जाण्यास तेथील प्रशासनाने बंदी घातली.

रोज अनेक पर्यटक पोलीस आणि पहारेकऱ्यांची नजर चुकवून या स्वर्गाच्या वाटेवर जातात. होनूलोलूच्या स्थानिक प्रशासनाने २०१६ मध्ये या पायऱ्या काढून टाकण्याचा निर्णय घेतला. आता ही स्वर्गाची वाट २०२२ पर्यंत इतिहासजमा होणार असल्यामुळे कायमचा एक साहसी रस्ता इतिहासजमा होणार आहे.

Leave a Comment