सरकारलाच माहित नाही आधार कार्ड बनवण्यासाठी येतो किती खर्च?


मुंबई – ‘आधार’ ओळखपत्र योजना देशात हजारो कोटी रुपये खर्च करून आणली गेली होती. आता तर आधार ओळखपत्र जवळपास सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी असणे अपरिहार्य बनले आहे. असे असताना, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एक आधार कार्ड बनवण्यासाठी किती खर्च येतो, किंवा आला पाहिजे याबद्दल सरकारकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची बाब उघड केली आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून आधारविषयी विविध माहिती अनिल गलगली यांनी मागवली होती. यावेळी, आणखी किती आधार कार्डांची भारतात गरज आहे, प्राधिकरणाचे महासंचालक अशोक कुमार यांनी ही माहितीही विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे नसल्याचे सांगितले. २० सप्टेंबर २०१९ला एक अधिसूचना एकूण आधार कार्ड बनविण्याच्या अंदाजित लक्ष्याबाबत देण्यात आली होती. एकूण अंदाजित ओळखपत्रांची संख्या यातही नमूद केलेली नाही.

किती आधार कार्ड आतापर्यंत एकूण तयार केले गेले आहेत, या माहितीसाठी केलेला अर्ज हा लॉजिस्टिक्स विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. तर, वित्त विभागाकडे आधार ओळखपत्र तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाबाबतचा अर्ज हस्तांतरित करण्यात आला. अनिल गलगली यांना वित्त विभागाचे सहायक महासंचालक सय्यद रवीश अली यांनी स्पष्ट केले की, वित्त विभागात मागितलेली माहिती उपलब्ध नाही. अनिल गलगली यांनी संकेतस्थळाला भेट दिली असता, 124 कोटी 62 लाख 21 हजार 866 कार्ड तयार झाल्याचे आढळले. तथापि प्रत्येक आधार कार्ड बनविण्यासाठी येणाऱ्या खर्चाची माहिती उपलब्ध नव्हती.

अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आकडेवारीची माहिती देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रत्यक्षात मागितलेली माहिती आणि उत्तर देण्याचे टाळले आहे. माहिती जर उपलब्ध नसेल तर ती कोठे उपलब्ध आहे यावर प्राधिकरण मौन बाळगून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनिल गलगली यांनी पत्र लिहून सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment