विश्वचषक स्पर्धेदरम्यान अनुष्काची उठबस करण्यात दंग होती निवड समिती


नवी दिल्ली – टीम इंडियाचे माजी यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या फारुख इंजिनियर यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि संघ निवड समितीवर जोरदार टीका केला आहे. 81 वर्षीय या माजी फलंदाजाने निवड समितीवर जोरदार आगपाखड केली आहे. त्याचबरोबर त्यांनी निवड समितीचे वर्णन मिकी माउस म्हणून करत विश्वचषक स्पर्धेदरम्यान विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासाठी हे लोक चहाचा कप उचलण्याचे काम करत होते. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दिलीप वेंगसरकर यांच्यासारख्या माजी खेळाडू निवड समितीचा भाग असावा, असेही ते म्हणाले.

फारुख इंजिनिअर आपल्या परखड मतासाठी ओळखले जातात आणि त्यांनी पुन्हा एकदा अत्यंत कठोर शब्दात भारतीय निवड समितीवर हल्ला केला आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील सद्य निवड समितीची स्थापना सन 2016मध्ये करण्यात आली होती. इंग्लंडमध्ये आयोजित विश्वचषक 2019 दरम्यान फारूख यांनी एका घटनेचा उल्लेख केला आहे, ज्यात ते एका व्यक्तिला भेटले जो निवड समितीचा सदस्य होता. परंतु फारूक यांना त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार फारुख इंजिनिअर म्हणाले, सध्याच्या निवड समितीकडे आवश्यक अनुभव नाही. आमच्याकडे मिकी माउस निवड समिती आहे. विराट कोहलीचा मोठा प्रभाव आहे, तो चांगला आहे, परंतु निवडकर्ता पात्र कसे झाले? त्यांनी फक्त 10-12 कसोटी सामने खेळले आहेत. विश्वचषक स्पर्धेदरम्यानही मी निवड समितीच्या एका सदस्याला भेटलो, ज्याची मला माहितीही नव्हती. भारतीय संघाचे ब्लेझर त्याने घातले होते, म्हणून मी विचारले तू कोण आहेस? तो म्हणाला की मी टीम इंडियाचा निवड समितीचा सदस्य आहे. हे सर्व विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिचा चहाचा कप उचलण्याचे काम करत होते. मला वाटते की दिलीप वेंगसरकर यांच्यासारखे माजी खेळाडू निवड समितीत असावेत.

माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचे नवे अध्यक्ष झाल्याबद्दल फारुख इंजिनिअर यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, तो एक उत्तम खेळाडू होता. एक कर्णधार जो धैर्याने निर्णय घेत होता. मला आशा आहे की सौरव गांगुलीही बीसीसीआयच्या अध्यक्षपदाला शोभतील असेच धाडसी निर्णय घेईल.

फारुख इंजिनिअर वर्ष 1961 ते 1975 पर्यंत टीम इंडियाकडून 46 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांनी 31.08 च्या सरासरीने 2611 धावा केल्या आहेत. त्यांच्या नावे 2 शतके आणि 16 अर्धशतके आहेत. याखेरीज इंजिनिअर यांनी देशासाठी 5 एकदिवसीय सामने खेळले असून यामध्ये 38 च्या सरासरीने त्यांनी 114 धावा केल्या आहेत.

Leave a Comment