भारताचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना बांगलादेश बरोबर

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान ईडन गार्डन येथे खेळला जाणारा दुसरा सामना दिवस-रात्र असेल. याबाबतची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे. दोन्ही देशांचा हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असेल. ईडन गार्डन्स दिवस-रात्र कसोटी सामन्याचे आयोजन करणारे देशातील पहिले स्टेडियम असेल.

गांगुली यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, कसोटी क्रिकेट पुढे नेण्यासाठी ही चांगली संधी आहे. मी व माझा संघ याच गोष्टीच्या शोधात होतो. यासाठी विराट कोहलीला देखील धन्यवाद. त्याने माझ्या निर्णयला सहमती दर्शवली.

गांगुली यांनी सांगितले की, भारताच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्या दरम्यान अभिनव बिंद्रा, मेरी कॉम, पी. व्ही. सिंधू यांचा सन्मान करण्यासंबंधी विचार सुरू आहे.

पहिला दिवस-रात्र कसोटी सामना 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड या संघांमध्ये खेळला गेला होता. मात्र चार वर्षांपर्यंत भारताने एकही दिवस-रात्र सामना खेळला नाही.

भारत आणि बांगलादेशमध्ये कसोटी मालिकेआधी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना 3 नोव्हेंबरला खेळला जाईल.  भारत-बांगलादेशमधील पहिला कसोटी सामना 16 नोव्हेंबरला इंदौरमध्ये तर दुसरा व अखेरचा कसोटी सामना 22 नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळला जाणार आहे.

Leave a Comment