दहशतवाद्यांच्या रडारावर विराट कोहली


नवी दिल्ली : दहशतवाद्यांच्या रडारावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोहलीला मारण्याचा कट ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा नावाच्या एका नव्या दहशतवादी संघटनेने रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर विराटच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. या संदर्भातील दस्ताऐवज वृत्तवाहिनी एबीपी न्यूजच्या हाती लागले असून देशातील अनेक नामवंत व्यक्ती या दहशतवादी संघटनेच्या हिटलिस्टवर आहेत.

विराट कोहलीवर असलेल्या धोक्याची माहिती एबीपी न्यूजच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमध्ये आहे. दहशतवाद्यांची ही हिटलिस्ट दहशतवादाविरोधात काम करणारी संस्था एनआयएला पाठवली आहे. ही लिस्ट पाठवणाऱ्याने आपल्या नावाच्या जागी ऑल इंडिया लश्कर हाय पॉवर कोझीकोड, केरळ असे लिहिले आहे.

पण दहशतवाद्यांच्या निशाण्यावर विराट का आहे? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. भारताचा पुढील आठवड्यात बांगलादेश विरुद्ध सामना होणार आहे. विराटही या सामन्यात खेळणार असल्यामुळे विराटच्या सुरक्षेची खास काळजी घेण्यात येणार आहे. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर एखादा क्रिकेटर असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Leave a Comment