या ठिकाणी लग्नाआधी 25 लोक घेतात नवरदेव व त्याच्या कुटूंबातील सदस्यांच्या तोंडाचा वास

गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील पियाज गावात दारूविरोधात गावकऱ्यांनी आवाज उठवला आहे. येथे लग्न ठरवण्याआधी मुलीच्या कुटूंबातील व इतर 25 जणांचा समूह नवरदेव आणि त्याच्या कुटूंबातील सदस्यांच्या तोंडाचा व श्वासांचा वास घेतात. यामागील उद्देश हा की, मुलाच्या कुटूंबातील कोणत्याही सदस्याने दारू प्यालेली नसावी. जर कोणी दारू पिली असेल तर लग्न ठरत नाही. याच नियमांचे पालन साखरपुड्यावेळी देखील होते.

लग्नाच्यावेळी देखील नवरदेव आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या तोंडाचा वास घेतला जातो. जर त्यांच्या कुटूंबातील सदस्याने दारू प्यालेली असेल तर त्यांच्याकडून 1 लाख रूपये दंड घेतला जातो. गावामध्ये हे नियम 4 वर्षांपासून लागू करण्यात आलेले आहेत. गावामध्ये दारूमुळे 15 युवकांचा मृत्यू झाला होता. या सर्व युवकांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी होते. या घटनेपासून गावामध्ये हे नियम करण्यात आले.

गावातील अनेक लोकांनी सांगितले की, अनेक प्रकरणात नवरा दारू पित असल्याने महिलेचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. कुटूंबातील मुलांना देखील दारूचे व्यसन लागले आहे. हे बघून पंचायतीने लग्नाआधी नवरदेव त्याच्या कुटूंबातील सदस्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. या नियमामुळे अनेक कुटूंबाचे भले झाले. गावात दारूबंदी करण्यासाठी पोलिसांना देखील यश आले नव्हते. मात्र या नियमांमुळे मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे.

 

Leave a Comment