फेसबुकच्या माध्यमातून सत्यजित तांबेंचा आदित्य ठाकरेंना बहुमुल्य राजकीय सल्ला


मुंबई – युवासेनेचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी बहुमुल्य राजकीय सल्ला दिला आहे. शिवसेनेने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबतच्या भुमिकेवर ठाम रहायला हवे असे त्यांनी सुचवले आहे. तसेच मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंनाच मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका पत्राद्वारे स्वतःचा अनुभवाचा दाखला देताना फेसबुकवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सत्यजीत तांबे आदित्य ठाकरेंबाबत मैत्रीपूर्ण भावना व्यक्त करीत आपल्या फेसबुक पोस्टमधील पत्रात म्हणतात, २००७ साली मी २४ वर्षांचा होतो. त्यावेळी अहमदनगरच्या जिल्हा परिषदेवर मी निवडून गेलो होतो. यावेळी काँग्रेसला बहुमत असल्याने बहुतांश सदस्यांची मीच अध्यक्ष व्हावा अशी इच्छा असताना माझ्या कमी वयाचे कारण सांगत पक्षातील काही जणांनी माझ्याकडून ही संधी हिसकावून घेतली. बराच खल त्यावेळी देखील होऊन सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले होते.

अध्यक्षांनी त्यानंतर ठरल्याप्रमाणे काही आपले पद सोडलेच नाही. अखेर अडीच वर्षांनी पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि काँग्रेसने मला उमेदवारी दिली. पण सेना-भाजपच्या मदतीने विद्यमान अध्यक्षांनी माझा पराभव केल्यामुळे माझी अध्यक्षपदाची संधी हुकल्याचे, तांबे यांनी म्हटले आहे. तसेच हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलेच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती करतो असे तांबे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment