काकडेंचा दावा : आमच्या संपर्कात शिवसेनेचे ४५ आमदार


पुणे – राज्यातील विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले असून आता सर्वांचे सत्ता स्थापनेकडे आणि मुख्यमंत्रिपदाकडे लक्ष लागले आहे. अशातच भाजप हा १०५ जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यातच भाजपचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या ५६ पैकी ४५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा काकडे यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

एकीकडे सत्तास्थापनेचे शिवसेना भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आपल्याला देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पण संजय काकडे यांनी केलेल्या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आमच्या संपर्कात शिवसेनेचे ४५ आमदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी हा एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील खळबळजनक दावा केला आहे. आमच्या संपर्कात भाजपचे ५० आमदार असून ते आपल्याला शिवसेनेत घेण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आता यावर शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment