आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देणार रिलायन्स


मुंबई : आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्याची तयारी भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली आहे. डिजीटल सर्विस होल्डिंग कंपनी उभी करण्यासाठी अंबानी यांनी 24 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1.6 लाख कोटी रुपयांची योजना तयार केली आहे. रिलायन्स याअंतर्गत भारतात इंटरनेट शॉपिंगमध्येही वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे.

जवळपास 56 बिलियन डॉलर म्हणजेच 3.85 हजार कोटी रुपये मुकेश अंबानी यांची संपत्ती होती. पण, सौदी अरबच्या तेल कंपनीला रिलायन्स ऑईल अॅण्ड केमिकल व्यवसायात 20 टक्के भागीदार झाल्य़ानंतर आता मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती जवळपास 75 बिलियन डॉलर एवढी झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मते, त्यांच्या डिजीटल बिझनेससाठी ते एक संपूर्ण सब्सिडीअरी तयार करतील. त्याअंतर्गत ग्राहकांना डिजीटल सेवा पुरवल्या जातील. सोबतच रिलायन्स जिओचे सर्व कर्ज संपुष्टात आणले जातील. जिओचे फायनेंशियल ऑफिसर वी. श्रीकांत यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते, जिओवर 2019 च्या 30 सप्टेंबरपर्यंत जवळपास 84 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. तर सप्टेंबर महिन्यात जिओचा नफा हा 990 कोटी रुपयांचा होता. तर एकूण रेवेन्यू 12,354 कोटी रुपये एवढा होता. रिलायन्सने सुरुवातीला डिजीटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी 1,08,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची परवानगी घेतली असल्यामुळे जिओला कर्जमुक्त कंपनी करण्यात मदत होईल. त्यासाठी 1 एप्रिल 2020 पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे.

Leave a Comment