अजित पवारांच्या निवासस्थानी झळकले आगळे वेगळे पोस्टर


पुणे – विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये आपल्या समोरील उमेदवाराला तब्बल १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांनी धुळ चारल्यानंतर आता त्यावरून पोस्टरबाजीला उधाण आले आहे. बारामतीमध्ये आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल, अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

अजित पवार हे विधानसभा निवडणुकीत १ लाख ६५ हजार २६५ मतांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ संबोधलेल्या भाजपच्या गोपीनाथ पडळकरांसह सर्वच उमेदवारांचा दारूण पराभव झाला होता. तसेच त्यांच्यासमोरील सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाल्यानंतर अजित पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानाजवळ त्यांच्या अभिनंदनाचे पोस्टर लावण्यात आले. त्यावरील आगळावेगळा मजकूर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल, असा मजकूर छापण्यात आला आहे.

Leave a Comment