दोन नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडेंसाठी देणार राजीनामा !


मुंबई – धनंजय मुंडे यांच्याकडून परळी मतदारसंघातून पराभव पत्करावा लागल्यानंतर पुन्हा आपल्या मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवावी, आपण त्यासाठी राजीनामा देऊ, अशी तयारी दोन नवनिर्वाचित आमदारांनी दाखवली आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन जागा सोडण्याचा प्रस्ताव पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या आमदार मोनिका राजीव राजळे यांच्या पाठोपाठ गंगाखेड मतदारसंघातील रासपचे रत्नाकर गुट्टे यांनीही मांडला आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी समर्थकांमधून होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनीही पंकजा यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केल्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा ३० हजारांपेक्षाही अधिकच्या मताधिक्य़ाने पराभव केला. भाजप महायुतीचे सरकार राज्यात स्थापन होत असल्यामुळे सत्तेत भाजपच्या नेत्या पंकजा यांना स्थान मिळणार का? यावरुन समर्थकांत अस्वस्थता निर्माण झालेली असतानाच पाथर्डीच्या नवनिर्वाचित आमदार मोनिका राजळे यांनी शुक्रवारी पंकजा यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग पाथर्डी मतदारसंघात असल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक घेऊन पंकजा यांनी सत्तेत जावे, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे. तर कारागृहात असताना निवडून आलेले गंगाखेड मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनिर्वाचित आमदार रत्नाकर गुट्टे यांनीही पंकजा मुंडे यांच्यासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

गुट्टे यांचे जावई रासपचे युवा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी परभणी येथे जाऊन विजयी मिरवणुकीनंतर गुट्टे यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी पंकजा यांच्या पराभवाबद्दल खेद व्यक्त करुन आमदारकीचा राजीनामा देऊन या ठिकाणी पंकजा यांना निवडून आणण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती फड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तर शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आष्टी मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार भीमराव धोंडे यांनी भेट घेऊन पंकजा या ओबीसीच्या नेत्या असून त्यांच्यामुळे अनेक मतदारसंघात भाजपला यश मिळाले आहे. परळी मतदारसंघात पराभव झाला असला तरी त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करून पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे. इतर काही आमदारांनीही याच पध्दतीने मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment