आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेने स्वीकारावे : रामदास आठवले


मुंबई – आता रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे असे म्हटले आहे. समसमान फॉर्म्युला शिवसेनेने समोर आणून अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. भाजपला हा प्रस्ताव मान्य होईल असे वाटत नाही, शिवसेनेने त्यापेक्षा पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे आणि आदित्य ठाकरेंना त्या पदी बसवावे अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अशी ऑफर भाजपने दिली तर ही ऑफर शिवसेना स्वीकारेल असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. त्यांनी ही बाब एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली.

जनतेने महायुतीला निवडले असून दोन्ही पक्षांनी त्या जनमताचा आदर करावा आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेने स्वीकारावे अशी अपेक्षा रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे. याबाबत आपण भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचेही आठवलेंनी म्हटले आहे. येत्या चार ते पाच दिवसात सत्तास्थापनेचे काय करायचे याचा निर्णय होईल असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. भाजपला निवडणूक निकालात १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांची युती असल्यामुळे महायुतीचे सरकार येणार हे उघड आहे. पण अद्याप मुख्यमंत्री कोण होणार हा पेच सुटलेला नाही. कारण शिवसेनेने मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी हवे अशी मागणी केली आहे.

विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना हे एकत्र लढले होते. २२० के पार असा नारा या निवडणुकीत भाजपने दिला होता पण प्रत्यक्षात तो काही आला नाही. १०५ जागांवर भाजपला तर शिवसेनेला ५६ जागांवर समाधान मानावे लागले. बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झाल्याने आणि शरद पवारांनी विरोधकांच्या वतीने नेटाने सामना दिल्याने भाजपला अपेक्षित होते तसे निकाल समोर आले नाहीत. असे असले तरीही महायुतीच्याच बाजूने जनमताचा कौल आहे. अशात आता शिवसेनेची भूमिका सत्तास्थापनेसाठी महत्त्वाची ठरते आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदात अर्धा वाटा मागितला आहे, अडीच वर्षांसाठी भाजपकडे मुख्यमंत्रीपद आणि अडीच वर्षांसाठी शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद अशी शिवसेनेची प्रमुख मागणी आहे. मात्र ही मागणी मान्य होईल असे वाटत नाही तेव्हा शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे अशी अपेक्षा रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment