कोल्हापूरबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण


कोल्हापूर – विधानसभा निवडणूक निकालानंतर काल कोल्हापूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी कोल्हापूरमधून अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल हा निकाल अनाकलनीय असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या कथित वक्तव्यावरून सोशल मीडियावर रान उठले आहे.

दरम्यान, त्यावर सोशल मीडियावर माझी बदनामी करण्यात येत असल्याचे स्वतः चंद्रकांत पाटील यांनी म्हटले असून मी झोपेतही कोल्हापूरबाबत तसे वाक्य उच्चारु शकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मी पत्रकार परिषदेत व्हॉट्सअ‍पवर आलेला मेसेज वाचून दाखवला. त्यातल्या शेवटच्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेचा उपमर्द करणारे वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारु शकणार नसल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले आहे.

मी पत्रकार परिषद कोल्हापुरातील महायुतीच्या पराभवाची कारणे सांगण्यासाठी आयोजित केली होती. मी त्यात व्हॉट्सअॅपवरील एका मेसेजचा संदर्भ दिल होता. पण, मी कदापीही त्या मेसेजमधील शेवटच्या वाक्याशी सहमत नाही. या एका वाक्यावरून माझी सोशल मीडियावर बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात विधानसभा निवडणूक निकालानंतर काल (दि.२७) पत्रकार परिषद घेतली. पाटील यांनी कोल्हापुरात महायुतीच्या जागा आठ वरून एकवर आल्याची कारणमीमांसा करताना एका व्हॉट्सअप मेसेजचा संदर्भ देत भूमिका मांडली. भाजपने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची यादी त्या मेसेजमध्ये होती. अंबाबाई मंदिर, कोल्हापूरचे विमानतळ, रेल्वे सेवा याविषयी कामे भाजपने केल्याचे संदर्भ देण्यात आले होते. तसेच टोल आणि एलबीटी रद्द केल्याचाही उल्लेख होता. एवढे करून देखील भाजप-शिवसेनेला कोल्हापूरकरांनी नाकारले, असे सांगत सगळे जग सुधारेल पण, कोल्हापूर सुधारणार नाही, या वाक्याने मेसेजचा शेवट झाला. याच वाक्यामुळे पाटील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. आता पाटील यांनी त्यावरुन स्पष्टीकरण दिले आहे.

Leave a Comment